वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय चौतिसावा

ग्रामगीता

अध्याय चौतिसावा : प्रारब्धवाद

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास ।
तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥

करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । 
आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥

सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध । 
म्हणोनि केलें असे विशद । अवतारतत्त्व हें सारें ॥३॥

लोक करूं लागतील सत्कार्य । तरि गांवीं नांदेल सर्व ऐश्वर्य । 
त्यासाठी वाढविलें पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकीं ॥४॥

परि श्रोते बोलती त्यावरि वाचें । अहो ! भाग्यचि हीन आमुचें । 
म्हणोनि आमुच्याने कोणचें । सत्कार्य नोहे ॥५॥

मनांत असतें कांही करावें । परि वेळचि जरा ना फावे । 
सांगा यास काय करावें । आम्हीं तरी ? ॥६॥

मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड । 
कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करितां ॥७॥

गरजेपोटीं जन्मे युक्ति । प्रसंग आणितां वाढे शक्ति । 
प्रयत्न पेरतां फळें येती । आवडी ऐसीं ॥८॥

श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ? 
यास पाहिजे भाग्य उघडलें । आम्हां वाटे ॥९॥

इच्छेंत जरी राज्य जडलें । तरी रोजचेंचि कार्य नडलें । 
तेथे उदंड मनांत आलें । तरी काय होतें ? ॥१०॥

इच्छेप्रमाणें सर्वांस घडतें । तरि काय भिकारी बनावें वाटतें ? 
इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥

कोणास सहजमार्गी चालतां । धनाचा हांडा सापडे आइता । 
त्यांना बघा इच्छा न करितां । मिळालें धन ॥१२॥

कोणी दरिद्रयाच्या घरीं जन्मले । मेंढयाबकर्‍या चारूं लागले । 
अचानकचि भाग्य उघडलें । गेले दत्तक राजवाडीं ॥१३॥

ऐसें कोण्या उपायें होतें । हेंचि विचारावें वाटे आपणातें । 
प्रयत्न केल्यानेच फळ येतें । हें तों येथे शोभेना ॥१४॥

गांवीं आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान । 
नाना कलांनी निपुण । परि पोटाचेंहि भागेना ॥१५॥

सांगा याहूनि काय करावें ? इच्छेने फल कैसें पावे ? 
कोण्या परीने योजावें । कार्य आम्हीं आपुलें ? ॥१६॥

मित्रहो ! तुमचें सर्व म्हणणें । ऐकलें मीं जीवेंप्राणें । 
म्हणोनीच आपल्या परीने । देतों उत्तर तुम्हांसि ॥१७॥

भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध । 
गांवोगांवच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥

ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न । 
तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुलें ॥१९॥

एरव्ही हें भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना । 
त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥

कांही संस्कार असती पूर्वीचे । कांही प्रयत्न या जन्मींचे । 
मिळोनि येई फळ भाग्याचें । उदया लोकीं ॥२१॥

संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्रीं शास्त्रवेद । 
हें पूर्व जन्मींचें संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचें ॥२२॥

कांही पूर्वसंस्कारगति । कांही करणी कांही संगति । 
कांही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळीं येती भाग्यफळें ॥२३॥

पाहणार्‍यास अचानक दिसती । याचें भाग्य उघडलें म्हणती । 
धनवैभव लाभतां ठरविती । भाग्यवंत लोकीं ॥२४॥

येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ? 
ऐका त्याचेंहि सांगतों । उत्तर आता ॥२५॥

असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत । 
भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत तें नाही ॥२६॥

भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें । 
अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥

आणि सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । 
सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥

आपणासीच सुख व्हावें । आणि दुसरे ते ओसरून जावे । 
ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥

कांही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावें हसती । 
म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥

मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जातें भलतिया वाटां । 
पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ? ॥३१॥

कुणाचें भाग्य रात्रींतून येतें । जुगारीं कधी द्रव्य लाभतें । 
दुसर्‍या दिनीं पुन्हा धांव घेतें । दरिद्रपण त्याच वाटें ॥३२॥

हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर । 
भाग्य तेंचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥

भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावें । 
भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥

भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझें म्हणणें नोहे । 
परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥

एकाची श्रीमंती दुसर्‍या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी । 
त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ? ॥३६॥

माती धरितां सोनें होतें । चालत्या काळीं भाग्यचि तें । 
परि अहंकारें व्यसनें मुकले सेवेतें । झाली शेवटीं दुर्दशा ॥३७॥

म्हणोनि म्हणतों प्रयत्न करा । आपापलें जीवन सुधारा । 
भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥

भाग्यकरितां संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावें । 
तैसेचि प्रयत्न करीत राहावें । आळस सांडोनि ॥३९॥

जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । 
त्यानेंच पावतें भाग्य थोर । सकळ योजना साधतां ॥४०॥

केल्यानेच भाग्य फळतें । केल्यानेच स्वर्गसुख मिळतें । 
केल्यानेच सर्वकांही होतें । मानवाचें ॥४१॥

माणूस बसतां भाग्य झोपतें । चालतां पुढेचि घेई झेप तें । 
प्रयत्नांचेंचि रूपांतर होतें । भाग्यामाजीं निश्चयाने ॥४२॥

ऐसें बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान । 
धर्मग्रंथ हेंचि प्रमाण । बोलले लोकीं ॥४३॥

ज्याचें अचानक भाग्य उघडले । त्याचें सुकृत साचत आलें । 
म्हणोनीच एकाएकी लाभलें । भूषण तया ॥४४॥

जरि त्याने केलेंचि नसतें । तरि तें आज कैसें लाभतें ? 
देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसें म्हणणें शोभेना ॥४५॥

एकाएकीच भाग्य लाभतें । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणतें । 
तरि आहे हेंहि जातें । मनुष्यपण हातचें ॥४६॥

तुम्ही म्हणाल मग काय करावें ? आपणहि आता प्रयत्नशील व्हावें । 
प्रबल इच्छेसि वाढवावें । सदभाग्याच्या ॥४७॥

काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल । 
परि सत्कार्य वाया न जाईल । केलें तें तें ॥४८॥

तीव्र इच्छेने कार्य केलें । तें आज जरी नाही फळलें । 
तरी अचानकचि भाग्य उघडलें । वाटेल ऐसें फळ येतां ॥४९॥

श्रोते साशंक झाले हृदयीं । प्रयत्न इच्छिलें फळ देई । 
ऐसें कथिलें जें जें कांही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥

प्रयत्नें साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय । 
तरी कां उपाय करितां अपाय । अनुभवा येती ? ॥५१॥

सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावें मरण । 
येथे पूर्वी तरी केलें साधन । मरणाचें कोणी ? ॥५२॥

लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती । 
तरी कय होते त्यांची स्थिति ? प्राण जाती कितीकांचे ॥५३॥

कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्‍याची फजीती । 
नाही करणाराची संगति । अंतकाळीं हाल त्याचे ॥५४॥

त्याने काय बिमार पडावें इच्छिलें । म्हणोनि देवाने तसें केलें ? 
यांत काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हातें स्वहिताचे ? ॥५५॥

तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती । 
सांगा यांत मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ? ॥५६॥

आम्ही म्हणतों सूत्रधार हरि । त्याच्या हातीं दैवाची दोरी । 
मानव बाहुलीं कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥

मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यांत मज न वाटे विचित्रपण । 
हें तों आहे सहज अज्ञान । रुजलें लोकीं ॥५८॥

सुखासाठी करिती धडपड । दु:खीं देव घालिती आड । 
मूळ न शोधितां बोलती बोजड । सिध्दान्तवाक्यें ॥५९॥

आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि । 
येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ? ॥६०॥

वाफ्यांत मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबीं आलें । 
येथे पाण्याने काय केलें ? दिलें फळ जैसें तैसें ॥६१॥

देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वयें न चालवी सूत्र । 
कर्में फळती पवित्रापवित्र । आपुलींच आपणा ॥६२॥

देवाचेंच हें असतें करणें । तरि लोक कां निर्मिता केविलवाणे ? 
कशासि लाविता अल्पकाळीं मरणें । जीवप्राण्यासि ? ॥६३॥

हें तों आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणें आणि मरण । 
यांत शंका घेण्याचें कारण । मुळीच नाही ॥६४॥

आपणचि इच्छा करितों । म्हणोनिया जन्माला येतों । 
यांत कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ? ॥६५॥

तैसेंचि आहे मरणाचें । आम्हीं कारण व्हावें बिघडविण्याचें । 
जेव्हा असह्य होय भोगणें साचें । तेव्हा म्हणावे ’ वाचवा ’ ॥६६॥

चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला । 
संकटीं सापडतां म्हणे ’ बोला । कैसें केलें देवाने ? ’ ॥६७॥

कितीकांचें दुखवावें मन । हिरावूनिया आणावें धन । 
मग भोग येतां दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥

माणसाला मरावें ऐसें न वाटे । परि मरणाऐसें केलें ओखटें । 
पुढे आसक्तीने म्हणे ’ मोठें । देवा ! संकट ओढवलें ’ ॥६९॥

मरणाऐसें करावें आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान । 
मग भोग येतां म्हणावें ’ नको मरण ’ । कैसें कोण मानील ? ॥७०॥

हें म्हणणें कांही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे । 
तो वेळेवरीच करतां नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥

जन्मणेंहि इच्छेने होतें । परि त्यासि गर्भधारणा लागते । 
अंतरीचें प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥

अग्नि देवोनि लोखंड तापवावें । आणि लगेच म्हणे थंड व्हावें । 
ऐसें कैसें घडेल स्वभावें । एकाएकी ? ॥७३॥

जीव कर्म करितां स्वतंत्र । त्याचा भोग भोगतां परतंत्र । 
केलें त्याचें फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥

सर्वासचि वाटे कधी न मरावें । सर्वांसचि वाटे राजे व्हावे । 
परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणें ॥७५॥

तेणें भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग । 
इच्छेनि व्यसनी होतां झाला क्षयरोग । जगणें मग साधेना ॥७६॥

म्हणोनि सांगतों जें जें होतें । तें इच्छाबळेंच प्रत्यया येतें । 
यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरतें । तरीच साधतें कार्य पुढे ॥७७॥

एक इच्छा असते चंचल । तींत होतो नेहमी बदल । 
एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥

कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसों पाहे । 
नाही म्हणोनिया काय होय ? प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥

बादशहा ’ मी गरीब ’ बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला । 
तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥

तैसी इच्छा परिपाकासि आली । आतां वृत्ति फळासि भ्याली । 
मग ऐनवेळीं दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचें ॥८१॥

कित्येकांची प्रमाणें दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती । 
दिवस क्षण वेळा सांगती । येणार्‍या फळाची ॥८२॥

त्यांची आसक्ति देहांतूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली । 
कित्येकांनी दुसर्‍यांचींहि कथिलीं । परिपक्व फळें ॥८३॥

विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते । 
आधीच वृत्ति अविचारपंथें । जाऊं न देती ॥८४॥

अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगतां तळमळती । 
अति होतां भलतीच घेती । विकृति मनीं वेडयाऐसी ॥८५॥

आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली । 
दु:ख न सोसूनि धांव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥

मागील कुकर्म असह्य झालें । म्हणोनि जीव द्याया धावले । 
आतां मृत्यु येईल तरीच भलें । वाटे तयांसि ॥८७॥

खरोखर मरणें एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचें विरामस्थान । 
परि केलेल्या पापपुण्याचें निवारण । तेणें नव्हे ॥८८॥

जैसा कपडा अंगींचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा । 
तैसाचि जीव मरणीं समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥

कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे । 
येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करितां ॥९०॥

इच्छेने घेतलें तलम वस्त्र । मग तें टिको म्हणे वर्ष सहस्त्र । 
ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणें लागे आधीचें ॥९१॥

एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारतां हौस पुरी । 
मग घाबरोनि म्हणे ’ देवा ! आवरी । सत्वरि आता ’ ॥९२॥

एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून । 
पहिलें इच्छाकर्म गतिमान । भोगावेंचि लागे ॥९३॥

नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई । 
नवी इच्छाहि याच क्रमें येई । फळासि पुढे ॥९४॥

मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवें अंत:करण आधार । 
यांत दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगें ॥९५॥

यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार । 
एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥

इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार । 
तेंचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥

त्यांतून जें भोगायासि आलें । तेंचि प्रारब्ध बोललें । 
तें भोगणें प्राप्तचि झालें । न चुके सहजीं ॥९८॥

तें भोगतां केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड । 
तें क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचें ॥९९॥

ऐसें चाललें रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार । 
जन्ममरण, सुखदु:ख, व्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥

हें जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा । 
संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥

क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई । 
तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥