वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तिसरा

आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)

अध्याय तिसरा
(चित्तशुद्धीचे साधन)

॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥

श्रोती व्हावे सावधान । परिसावया विमल ज्ञान ।
गुरु शिष्याचिये वचन । पूर्ण करी सद्-भावे ॥१

अपूर्णाते पूर्णपण । दावावया सद्गुरु पूर्ण ।
तेचि श्रोतेजनी परिसोन । लीन व्हावे आपैसे ॥२

श्रेष्ठांचेचि ऐकोन वाद । अल्पज्ञ तों होई शुध्द ।
जेणे मिटेल द्वैतबंध । मायोपाधी पाशांचा ॥३

मागिलिये प्रकरणी । ऐकोनि दास-विनवणी ।
सद्गुरु तो कृपा-पाणी । पाजितसे सद्-भावे ॥४

तंव पाहोनी सद्-भाव पूर्ण । प्रसन्न झाले सद्गुरुचे मन ।
म्हणे एकाग्र करी श्रवण । प्रेमे कथीन वाक्यासी ॥५

जीव अविद्यातम अज्ञानी । चौऱ्यांशी लक्ष फिरता योनी ।
तया अवचित वेळा नरतनी । प्राप्त झाली पुण्यत्वे ॥६

पापपुण्य समान असती । तैच मिळे मनुष्यदेहगती ।
तयासी नसता सुसंगती । व्यर्थ जाय आसक्तीने ॥७

विषयी आसक्तपण आघवे । जडले तयासी स्वभावे ।
वैराग्येविण केवी सुटावे ? । ऐक भावे करुनिया ॥८

जयासी अनुताप न बाणला । तो आसक्तीत बुडाला ।
पुन:पुन्हा जन्मासी आला । गर्भवास भोगावया ॥९

विषयी आसक्तपण तुटणे । पाहिजेत वैराग्य लक्षणे ।
तयाविण मिथ्या भाने । सत्यचि वाटे ॥१०

वैराग्यास द्वय साधन । प्रथम चित्तशुध्दी जाण ।
दुसरे नित्यानित्यविवेक पूर्ण । साधला पाहिजे ॥११

चित्तशुद्धीचिया कारणे । उपासना संपादणे ।
तेणें तुटती भवबंधने । युगायुगी ॥१२

उपासना ती ऐसी करावी । प्रथम लीनता हृदयी धरावी ।
गुरुवचनी श्रद्धा ठेवावी । निश्चयेसी जाण पां 
१३

घेउनिया लहानपण । होई सद्गुरूंची वहाण ।
ऐकोनिया तयांचे वचन । पूर्णपणे मानावे 
॥१४

सोडुनिया हयगयी आळस । शरीरी राहावे उदास ।
तव तुटेल विषयपाश । मायिकांचा 
१५॥

अंगी वागलिया वाचोन । वैराग्य नवचे कधी जाण ।
शब्दज्ञाने व्यर्थ भान । लटकेपणी शोभतसे 
॥१६

ईश्वरभजनी धरीं प्रेम । कर्मोपासना हां तों नेम ।
साधावी भक्ती निष्काम । चित्तशुद्धीसाठी यां 
॥१७

हृदयी राखावा सद्-भाव । तेणें प्रसन्न होय सद्गुरराव ।
तयांचे बोधावरी अभाव । न करी केधवां जाण पां 
॥१८

ये देही तो प्रपंच करिती । लक्षी ईश्वरचरणी प्रीती ।
ऐंसी चित्तशुद्धीची रीती । निश्चयेसी जाण पां 
॥१९

सत्संगतीचिये वाचोन । विवेकबुद्धी नवचे जाण ।
नित्यानित्य करावया प्रमाण । सत्संगती धरावी 
॥२०

सत् म्हणजे नित्य जाण । संगती तो अनुसरण ।
अज्ञानी सत् भरवोन । असत्य लोपवावे 
॥२१

वारंवार पाहोनी विवेक । नित्याचे मानावे कौतुक ।
अनित्यी अभाव सत्यक । सर्वठायी ठेवावा 
॥२२

ऐंसी हीं सत्यसंगती । विवेक प्रगटेल चित्ती ।
नाशिवंत वाटेल देहस्थिती । निश्चयेसी जाण पां 
॥२३

तुच्छ वाटेल देहाभिमान । अंगी बाणेल लीनता पूर्ण ।
अंतरी प्रगटेल ज्ञान । नित्यानित्य वस्तूचे 
॥२४

तुच्छ दिसेल धन-दारा । सर्वचि मायिक पसारा ।
मन तें फिरोनि माघारा । सत्यतत्वी धावेल 
॥२५

अंगी प्रेमाचा पाझर । भक्ति-आनंद परिकर ।
तुच्छ वाटेल दृश्यसंभार । विवेक येता अंगी या 
॥२६

बापा ! स्वये वागलियावाचोन । कैसे विरेल कपटस्थान ? ।
न बाणेल शुद्धज्ञान । अनुभवा पावावयासी 
॥२७

ऐसा बाणता विवेक । चित्तशुध्दी होय निःशंक ।
वैराग्यभाव अमोलिक । बाणे शरीरी प्राणिया 
॥२८

विषयाची मुरेल मुरडी । कामना जळेल काळतोंडी ।
राहील नित्याची आवडी । सशंय न धरी यामाजी ॥२९

बाणता वैराग्य अंतरी । तंव होय बंद वृत्ती विकारी ।
स्थिरावेल मन ते निर्धारी । निश्चयेसी जाण पां 
॥३०

जोंवरी स्वयें न वागला । तोंवरी पाखंडी ठरला ।
शुकमुखीचा गलबला । व्यर्थ जाय 
॥३१

ऐकोनियां ऐसे वचन । दास बोले दीनवदन ।
वैराग्यावरी साधन । काय करावे स्वामीयां ? 
॥३२

ऐकोनी सद्-भाव-वचन । गुरु बोले प्रेमेकरुन ।
ऐक गड्या ! अकर्तेपण । कासयाने होंतसे 
॥३३

अवस्था साक्षी झालियावाचुनी । अकर्ता न होयचि प्राणी ।
तोंवरी त्या वाटणी । भोगावी लागे अज्ञाने 
॥३४

इतिश्री वेदान्तसारसंमत । दासतुकड्या विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । तृतीयोध्याय निरुपण कथियले 
॥३५

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय !