(चाल : ना छेडो गाली देऊँगी..)
कर्मठा ! कर्म हे सोडी,
ईश्वर जोडी आसरा ॥धृ.॥
का धरुनि धरुनि अभिमाना, म्हणसी 'मी जगति शहाणा' ?
रे ! जाईल वय हे जाणा, हर अज्ञाना पामरा ! ॥१॥
नच लीन कुणासी झाला, नच शरण प्रभू-पदी गेला ।
तो व्यर्थ जगी या मेला, गायी चुकली वासरा ॥२॥
पढतची खोविली वेळा, करुनिया पुस्तके गोळा ।
अंतरला जगदुत्पाळा, यम तो बांधी कासरा ॥३॥
ही सोड बला कामाची, धर माळ प्रभू - नामाची ।
तुकड्या गुरु-स्मरणी नाची, फोडी हृदया पाझरा ॥४॥