(चाल : अलमस्त पिलाया...)
कुठवरी भोगशिल मौजा ?
मग येति यमाच्या फौजा रे ! ॥धृ.॥
धन- दारा-सुत-साथी सगळे, राखतील दरवाजा ।
अंतकाळि देतील लोटुनी, काढुनि घेती बाजा रे ! ॥१॥
हालिमहाली पोटे सगळे, आजचि म्हणती 'राजा' ।
शेवट कोणी साथ करी ना, का भुलसी या साजा रे ! ॥२॥
चालतिचे हे गोत, पाहुणे आले अपुल्या काजा ।
काज सोडुनी व्यर्थ भटकसी, काळ वाजवी बाजा रे ! ॥३॥
चौऱ्यांशीचा फेरा पडतो, कोण भोगि तव आजा ?
तुकड्यादास म्हणे भय मोठे, भज-भज सद्गुरु - राजा रे ! ॥४॥