वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

कुणि दावा राम विसावा

(चाल : जगदीशा जगत्पाला...)

कुणि दावा हो कुणि दावा हो,
कुणि दावा राम विसावा हो ॥धृ.॥

बघता श्रमलो अनुदिनि त्याला,
चैन नसे मन वांछि तयाला ।
त्याविण हृदयी रुतला भाला,
विसर पडे निज - भावा हो ॥१॥

नेत्र तयाविण गळती सारे,
कर्णि वि-वर्ण मलिनता मारे ।
शरिरी त्याचे भरले वारे,
दास तया पदि न्यावा हो ॥२॥

काय मी चुकलो न कळे मला,
सांगा कुणि तरि कळते ज्याला ।
सोडुनि प्रभु मज कैसा गेला ?
तुकड्या तुकई लावा हो ॥३॥