(चाल: जगदीशा जगत्पाला ...)
घे करुणा गा ! घे करुणा,
घे करुणा रुक्मिणी - रमणा ॥धृ.॥
प्रल्हादास्तव धावुनि आला, स्तंभी प्रगटुनि गुरगूर वदला ।
कश्यपु तो निज हाते वधला, पतिताच्या पावन - श्रमणा ॥१॥
द्रौपदि-संकटि धावुनि आला, वस्त्र पुरविसी प्रेमे तिजला ।
दुर्योधन- छळ म्हणुनी केला, योगिजनांच्या निजनयना ! ॥२॥
ध्रुव अढळ-पदि नेउनि दिधला, अमर-सनद लिहूनी दे त्याला ।
किति वर्णू तव धीरज - लीला ? भयहरणा ! भवजलशमना ! ॥३॥
किति वानू गुण अवगुण सारे, दूर्जन मारुनि सुजना तारे ।
मी तो दीन अधम इतुका रे ! तुकड्यादासा घे चरणा ॥४॥