वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय एकोणचाळीसावा

ग्रामगीता

अध्याय एकोणचाळीसावा : भू-वैकुंठ

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान ।
नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥

गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई ।
उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥

पक्ष नाही पंथ नाही । जातिभेद विरोध कांही ।
एका कुटुंबापरी राही । गांव आपुलें आनंदें ॥३॥

ऐसें व्हावें कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतों वैकुंठपुरी ।
जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥

ग्रंथीं स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचतां तल्लीन होतें मन ।
त्यांत वर्णिले हेचि गुण । ते कां आपण न घ्यावे ? ॥५॥

सत्य युगाची ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा ।
याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ? ॥६॥

वैकुंठींचा प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद ।
आपुल्या गांवीं करावा सिध्द । हेंचि कर्तव्य सर्वांचें ॥७॥

देवाने जगीं अवतार घ्यावा । ऐसें कां वाटतें जीवा ?
त्रास अन्याय अनाचार नसावा । कोठेहि लोकीं ॥८॥

जरि हें आपणांसि आवडे । तरि आपणचि व्हावें कराया पुढे ।
न करितांचि देवानांवें ओरडे । तें सर्व वाया ॥९॥

सर्वचि भगवंताचे सखे । देवाचिया न्यायाने सारखे ।
मग व्यवहारींच पारखे । कां ठेवावे ? ॥१०॥

देवाचा न्याय जगीं आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा ।
यासि टाळील तो जाणावा । भक्त कैसा ? ॥११॥

जें एकास तेंचि सकळांस । हेंचि सत्य जीवनाचें रहस्य ।
सर्वांच्या सुखीं दु:खीं समरस । भावना राहती सकळांच्या ॥१२॥

उणा-अधिक गुणापाशी । नको जाति वा धनापाशी ।
अधिकार समानचि सर्वांसि । जीवनाचा ॥१३॥

सर्वांनी करावें शक्तिभर काम । अधिकारपरत्वें उपक्रम ।
सर्वांसि मिळावें सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर त्या ॥१४॥

ऐसीच सर्वांची योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी ।
अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी सर्वांमिळोनि ॥१५॥

वर्षाचें बजेट ठरवावें । माणसीं लागेल तें योजावें ।
अन्नवस्त्र अलंकार बरवे । सर्वांलागी घरदार ॥१६॥

वेगळा नफा वेगळी संपत्ति । वेगळें वैभव वेगळी महती ।
वेगळे चोचले कोणाप्रति । उरोंचि न द्यावे ॥१७॥

एकचि वस्त्र एकचि अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार ।
एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥

सर्वांना सारखाच सणवार । सर्वांचे एकचि मेजवानी-प्रकार ।
एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥

सणावारीं कोणी वारला । तरि गोडधड नसावें गांवाला ।
तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वांनी ॥२०॥

सर्वांची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा ।
सफाई, ध्यान, प्रार्थना सगळा । कार्यक्रम सामुदायिक ॥२१॥

सर्वांस ठेवावें सारखें । राहणी, खाणें, कपडे नेटके ।
सर्वांच्या मुलांस शिक्षण निकें । योग्यता-भेद बघोनि ॥२२॥

शिक्षणाची एकचि शाळा । राहणीचा एकचि सोहळा ।
प्रेमाचा सर्वभावें लळा । जेथे तेथे सर्वांशी ॥२३॥

समान व्यवस्था आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची ।
एकाची ती सर्वचि गांवाची । जबाबदारी ॥२४॥

जैसे, कोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गांवाचेचि म्हणे ।
वाटून द्यावेत आपुलाले कोणें । ऐसेंहि होतें ॥२५॥

परि त्यासि आहे मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा ।
पाहुण्याची वेळ, सीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥

एरव्ही करावा पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर ।
दिवस घालवूं नयेत भराभर । पाहुणेबाजींतचि ॥२७॥

तैसेचि लग्नादि उत्सव । त्यांसि झटावें गांवाने सर्व ।
परंतु नेहमीच धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥

गांवच्या मुलामुलीचें लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण ।
तेथे तिथि-मुहूर्ताचें कारण । कांहीच नाही ॥२९॥

असोत लग्नें दहा-पन्नास । गांवचीं शंभरहि त्या वर्षास ।
एकाच वेळीं सावकाश । उरकवावीं एके जागीं ॥३०॥

गांवीं असावें विवाहस्थान । भांडीकुंडीं बिछायत पूर्ण ।
सर्वांसाठी ठेवावी जमवोन । गांवातर्फे ॥३१॥

पवित्र विशाल सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन ।
सर्व वरांनी एकचि ठिकाण । पसंत करावें लग्नासि ॥३२॥

प्रसन्न वेळ आणि सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न ।
प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावें सर्वांनी ॥३३॥

गांवचे सर्व जमोनि मित्र । सहकार्य अर्पावें सर्वत्र ।
बसवोन वधुवरांना एकत्र । करावें लग्नकार्य ॥३४॥

लग्नादिकासाठी कोणा । उडवूं न द्यावें गांवच्या धना ।
कराव्या ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥

सर्वांनी आपलें सर्वस्व द्यावें । आदर्ह्स गांवाचें बनोनि राहावें ।
कोणींहि वेगळें न व्हावें । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥

जरी सर्वांनी संसारी असावें । तरी संततिनियमन सांभाळावें ।
तीन पुत्रांवरि पुत्र व्हावे । ऐसें इच्छूं नये कोणी ॥३७॥

पुत्र तान्हपणीं वाढला । दुसर्‍या दूधावरि लागला ।
की आईपासोनि सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥

गांवाने करावें शिशुसंगोपन । म्हातार्‍या प्रेमळ बायांकडोन ।
जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचें ॥३९॥

संपत्ति आणि संतति । सगळी गांवाची ठेव निश्चिती ।
वाढवोनि साधावी उन्नति । योग्य मार्गे गांवाची ॥४०॥

आपुल्या गांवाचें सुखदु:ख । सकळांसीच कळावें नि:शंक ।
येतां परस्परांची हांक । धावोनि जावें जिव्हाळयाने ॥४१॥

ज्याची कोणास जरूर पडे । त्यास त्याने बोलवावें निर्भिडें ।
कोणीहि घेऊं नयेत आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥

कामाचें महत्त्व पाहोनि । हांकेस त्वरित जावें धावोनि ।
तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥

जैसें आपण कोणाचें करावें । तैसेंचि आपुल्या वाटयास यावें ।
ऐसेंचि आहे स्वरूप बरवें । सहकार्याचें मानवांच्या ॥४४॥

म्हणोनि संकटीं धावोनि जावें । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे ।
जेणेंकरूनि सर्वांस वाटावें । कुटुंब माझें विश्वव्यापी ॥४५॥

जीव जगीं जन्मासि आला । ऐसेंचि सहकार्य द्यावयाला ।
अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावें सावधान ॥४६॥

कोणास नाही उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा ।
पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गांवाची ॥४७॥

कोण कोणाशीं वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो ।
कोण स्वार्थासाठी दंडतो । पाहणें काम आमुचें ॥४८॥

व्यसनाधीन कोण राहे । कोण जुगारीं बसलाहे ।
चिंतातुर कोण कां आहे । पाहणें काम आमुचें ॥४९॥

कोणी स्त्रियांना जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती ।
कोणी मुलीच न पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥

हे सर्व दोष सारावया । जबाबदार आम्हीच तया ।
गांवचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हांसि ॥५१॥

आमुचें करणें आमुचें नव्हे । त्या जामीन सर्व गांव आहे ।
हें समजोनि करावें होय-नोहे । सर्व कांही सर्वांनी ॥५२॥

आम्ही गांवीं दारू प्यालों । म्हणजे ’ दारूडे लोक ’ झालों ।
तेणें ’ दारूबाज गांव ’ नांव चालो । ऐसें होतें ॥५३॥

मग सांगा सर्व दारूबाज । होतां कैसें चालेल राज्य ?
म्हणोनि व्यसनादिकांचें बीज । येऊं न द्यावें शिवेआंत ॥५४॥

कोणी गांवीं तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी ।
तेणें मुलें नाचती दारोदारीं । नाचे जैसे ॥५५॥

नृत्यकलेच्या नांवाखाली । विषयांध भावना पसरली ।
ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गांवीं ॥५६॥

ही कला नव्हे, विडंबन । पैसे लुटायाचें स्थान ।
ऐसें नाटक, पथक, गायन । असों न द्यावें ॥५७॥

असेल ज्यांत जनहित । त्यासीच राहावें सहमत ।
वाढूं न द्यावा वाईट पंथ । कोणताहि गांवीं ॥५८॥

उत्तम कार्यासि जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले ।
व्यायाम खेळ मनोरंजन भलें । सर्वकांही ॥५९॥

कोठेचि नाही कुटिलता । तमाशे-दंडारींची हीनता ।
विचारल्याविण पुढारी येतां । भय वाटावें तयासि ॥६०॥

परका कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसें ।
कधीहि घडणार नाही ऐसें । गांवीं आमुच्या ॥६१॥

गांवाच्या बुध्दीची उच्च पातळी । लोकां कळावें तत्त्वें सगळीं ।
भाषणें चालावीं वेळोवेळीं । ग्रामोन्नतीचीं यासाठी ॥६२॥

आपण कोणी भिन्न आहों । ऐसी स्वप्नींहि भावना न येवो ।
यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गांवीं आमुच्या ॥६३॥

आमुच्या गांवीं प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर ।
विश्वांतील जे असतील थोर । ते आम्हांसि देवतुल्य ॥६४॥

त्याच मंदिरीं थोरांची जयंति । उत्सव आणि संत-पुण्यतिथि ।
जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळें ॥६५॥

साधुदेवतांची जयंति । पुण्यतिथि आदि उत्सव किती ।
इच्छा असेल ती सत्कृति । करावी गांवीं ॥६६॥

पण सर्वांचें असावें मत पवित्र । गांवाने होऊनि एकत्र ।
सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥

गांवचा उत्सव तो सर्वांचा । त्यांत हर्ष अति आदर्शाचा ।
तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥

नाहीतरि वाढे सांप्रदायिकता । जातीयता, व्यक्तिनिष्ठता ।
तेणें गांवाचे तुकडे होतां । वेळ न लागे ॥६९॥

म्हणोनि भेदचि नको कांही । सर्वांमनीं उत्साह राही ।
एक कुटुंब ऐसें सर्वहि । ग्राम आमुचें प्रेमळ ॥७०॥

आपुलें प्रेमचि अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत ।
आपुलें सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावें सर्वांसि ॥७१॥

गांवीं तेंचि सर्वांनी करावें । कीर्तिस्फूर्तीने गांव भरावें ।
घराघरांत शांतिसुख पावे । जनता जेणें ॥७२॥

कोणी एक मागे पडला । त्यास दुसर्‍याने सांभाळिला ।
ऐसें करितांच गांव झाला । सर्व गुणीं संपन्न तो ॥७३॥

गांवांत नाही झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा ।
सरळ सालस स्वभाव चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥

जरी मत भिन्न झालें । तरी पाहिजे गांवांतचि मिटविलें ।
आपुल्या गांवाविण नाही उरलें । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥

गांवचा झगडा गांवींच मिटे । निवडणुकीचें काम नव्हे खोटें ।
लंदफंद गांवांत नाही कोठे । ऐसें ग्राम सुंदर हें ॥७६॥

ऐसें सांगाया वाटावा अभिमान । तेंचि खरें गांवाचें भूषण ।
गांवांतील सर्व लोक सज्जन । परस्परांवरि अति मोह ॥७७॥

यांत कोणी उनाड दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला ।
एवढें करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग ॥७८॥

ज्याने गांवांत धिंगाणा घातला । तो गांव-घातकीच ठरला ।
त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि ॥७९॥

मग सर्वांनी मिळोनि ठरवावें । याचें पुढे काय करावें ।
निरुपाय होतां पाठवावें । निर्णय करोनि परगांवीं ॥८०॥

मग त्यास न मिळे सामान । अथवा त्याचें असलेलें धन ।
त्याने पळावें जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥

ऐसें बळकटपण जंव नाही । तंव आदर्श गांव तमाशाच राही ।
त्यांत स्थिरताच येणार नाही । कांही केल्या ॥८२॥

यावरि श्रोता प्रश्न करी । गांवांत अडचणी नानापरी ।
सर्व लोक जनोनि कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ? ॥८३॥

सर्वचि पाहती कारभार । तरि केव्हा करावें काम इतर ?
याने ग्रामजीवन स्थिर । होईल कैसें सांगाना ? ॥८४॥

ऐका याचें समाधान । करावी एक समिति निर्माण ।
सर्वांनी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे कांही कारभारी ॥८५॥

ज्यांनी आपुलें सर्वस्व द्यावें । तेचि समितीचे घटक बरवे ।
तन-मन-धन समर्पावें । ग्रामासाठी जयांनी ॥८६॥

त्या सर्वांना सभासद करावें । त्यांतून पांचजण निवडावे ।
सर्वांनीं प्रांजळ मनें पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥

सर्वांचें मालधन एक करावें । सभासदांचें मोजमाप घ्यावें ।
मग सर्वांचेंचि जीवन बनवावें । एकसारिखें ॥८८॥

सर्वांना भरपूर कामें द्यावीं । उत्पन्नाची व्यवस्था लावावी ।
सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥

सर्वांनी आपापलें काम करावें । विकणें घेणें पंचांनी पाहावें ।
आणि उद्योगासि सामान पुरवावें । पंचांनीच ॥९०॥

गांवाकरितां मार्ग जोडावा । गांवाकरितां व्यापार पुढे न्यावा ।
हरतर्‍हेचा संबंध आणावा । सुखी कराया गांव हें ॥९१॥

गांवांतून जें द्रव्य जावें । माल, मनुष्यबल, सामान बरवें ।
तें प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावें । गांवासाठी पंचांनी ॥९२॥

सर्वचि योजना पंचांवरती । कोणाचेंचि नाही इतराहातीं ।
इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक ॥९३॥

एकदा येथें अनन्य झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले ।
नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुलें करोनि ॥९४॥

पंच म्हणजे परमेश्वरदूत । सर्वांची चिंता करी निश्चित ।
याविषयीं कोणाचें दुमत । असूंचि नये ॥९५॥

तयांनी सर्व काळजी घ्यावी । गांवची जनता सुखी ठेवावी ।
निर्णय देतांचि ऐकावी । हांक जनतेने पंचांची ॥९६॥

ग्रामीं जनता असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी ।
सदा तत्पर सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥

पंच बोलले तें वेदप्रमाण । हीच गांवधर्माची खूण ।
यांतचि ग्रामाचें आदर्शपण । आमुच्या मतें ॥९८॥

आमुचें गांव एक कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ ।
सर्वांवरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा ॥९९॥

नसतां कोणाचेंहि शासन । न्यायाने वागती सत्ययुगीं जन ।
त्याचेंचि रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥

या योजनेचें एकचि मरण । तेंहि देतों लक्षांत आणोन ।
पंच म्हणोनि निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥

सेवाहीनांची पंचायत । ती गांवास करील पंचाईत ।
लोकशाही म्हणजे लोकांचें मनोगत । सिंहासनीं चढावें ॥१०२॥

लोकशाही म्हणजे लोकांचें हित । लोकांकडूनि व्हावें हातोहात ।
सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥

तीच म्हणावी लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही ।
सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥

लोकशाहींत जो सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी ।
लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥

सर्व लोक कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर ।
तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥

पंच तो असे आमुच्यांतील । अधिक कामकर्ता आचारशील ।
ज्यासि संडास-सफाईचेंहि नवल । नसे कांही ॥१०७॥

अधिक सुरळीत काम करील । नेमाने निष्ठेने राहील ।
तोचि अधिकारी होईल । या गुणांनी गांवाचा ॥१०८॥

येथे महत्त्व सदगुणांचें । धाडसाचें, स्वार्थत्यागाचें ।
तेचि पुढारी होती गांवाचे । जे गांवास देव मानती ॥१०९॥

ज्याने गांवचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला ।
त्याचाचि असावा बोलबाला । गांवामाजीं आपुल्या ॥११०॥

तोचि पंच अतिसात्विक । गांव मानी जगन्नायक ।
एक सेवाचि महापूज देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥

त्याला नाही दुसरा धर्म । त्याला नाही दुसरें कर्म ।
एक सेवाचि त्याचा उपक्रम । सर्वकाळ गांवलोकीं ॥११२॥

त्याचें सर्वस्व आमुच्या करितां । म्हणोनीच तो आमुचा पिता ।
जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥

तोचि पंच निवडावा । श्रध्दाविचारें ओळखावा ।
गटबाजीचा होवो न द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥

करावें सकळांच्या हिताचें । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचें ।
जो करि सर्वांहूनि हित लोकांचें । तोचि नेता मानावा ॥११५॥

सज्जनांचें असावें पंचमंडळ । जें गांवा चालवी सर्वकाळ ।
आपुलें कुटुंबचि गांव सकळ । मानावें त्यांनी ॥११६॥

परस्परांना घेऊनि चालावें । परस्परांचें हृदय एक व्हावें ।
कोठे उणें पडतां आपणचि समजावें । उणे असों ॥११७॥

आपुल्या व्यक्ति-कुटुंबा करितां । न व्हावी गांवाची अव्यवस्था ।
ऐसी दृष्टि असावी समस्तां । कार्यकर्त्यासि ॥११८॥

अन्यायें पीडा न होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास ।
याची जाणीव असावी प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥

सार्वजनिक वस्तु घरीं भोगणें । आप्तजनांसि सवलती देणें ।
हें टाकूनि करावी चोखपणें । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥

आपुला दुराग्रह दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा ।
शक्यतों कारभार चालावा । एकमताने गांवाचा ॥१२१॥

पांचामुखीं परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार ।
नियम पाळतां वाटावें सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥

सर्वांनी सर्वांसाठी झटावें । सर्वांच्या हितांत स्वहित पाहावें ।
थोरांनी याचे धडे दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥

यांतचि आहे मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण ।
हीच आहे खरी खूण । आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥

ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेंचि स्वराज्य ।
बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥

आमचें ग्रामचि एक राज्य । सर्वांचें माहेर अविभाज्य ।
ऐसे आदर्श होती जे जे । नातें आमुचें त्यांच्याशी ॥१२६॥

दुसरें गांव शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामीं राहे ।
सहकार्य देती पंच निश्चयें । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥

पंचमंडळ निष्ठेने राही । तें तें गांव भूवैकुंठ होई ।
त्याच्या प्रभावें पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥

ऐसें जंव गांव साधलें । तंव तें प्रांतांत प्रमुख झालें ।
ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच तें भूषण देशासि ॥१२९॥

देश ऐसा उन्नत होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय ।
एरव्ही जो स्वार्थे पुढें घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥

म्हणोनि ऐका लक्ष लावून । स्वर्ग कराया जगीं निर्माण ।
करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥

घ्या वाचून, करा तातडी । मग मनन करोनि आवडीं ।
घाला या आदर्शयोजनेंत उडी । आपुलें सर्वस्व देवोनि ॥१३२॥

श्रोतेहो ! ऐकिलें काय वचना ? मग वेळ कासयासि पुन्हा ?
आजचि तनमनधन समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥

यानेच थोरांची इच्छा सफळ । सार्थकीं लागे ज्ञानभक्ति सकळ ।
मिटेल अंतर्बाह्य तळमळ । तुकडया म्हणे सर्वांची ॥१३४॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१३५॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥