वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय चाळीसावा

ग्रामगीता

अध्याय चाळीसावा : ग्रंथाध्ययन

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन ।
परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥

गांवोगांवीं ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी ।
आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥

गांव व्हावया वैकुंठपूर । काय कामीं न येती ग्रंथ इतर ?
कोणत्या उपायें होतील संस्कार । दृढ गांवाचे ? ॥३॥

याचें उत्तर ऐका आता । वेगळी नोहे ग्रामगीता ।
येथे नाही अन्य सदग्रंथा । विरोध कांही ॥४॥

सर्व उपनिषदादि गायी । दोहूनि केली गीतामाई ।
तैसेंचि संतग्रंथ सर्वहि । साररूपें या ग्रंथीं ॥५॥

सर्वांभूतीं भगवदभाव । हा संतश्रेष्ठांचा अनुभव ।
त्या तत्त्वाचीच उठाठेव । या ग्रामगीतेमाजीं ॥६॥

गीतेचें विश्वरूपदर्शन । वेदाचें विराटपुरुष-वर्णन ।
संतांच्या विश्वात्मक देवाची खूण । लाभे येथे सक्रिय ॥७॥

अनेक ग्रंथांतील वर्णनें । अनेक तीर्थांतील दर्शनें ।
अनेक कथाकीर्तनांतील उदाहरणें । तींहि याचसाठी ॥८॥

लोक भुलले सहकार्य देणें । झालें स्वार्थांध विकृत जिणें ।
आपुल्यासाठी फजीत करणें । लोकांसहि सुरू झालें ॥९॥

हें कोण्यारीतीं निघोनि जाय । याचाच शोध आणि उपाय ।
करावया महापुरुषांनी सोय । अनुभव घेवोनि लाविली ॥१०॥

वाट चालतां त्यांच्या पाउलीं । बोल बोलतां त्यांच्या बोलीं ।
जीवन-सफलता होय आपुली । सर्वतोपरीं निश्चयें ॥११॥

यासाठी ग्रंथ-पोथी वाचावी । जनता सगळी जागृत करावी ।
गांवें संस्कारांनी भरावीं । सहकार्याच्या या मार्गें ॥१२॥

मानवतेची जागवाया शिकवण । गांवीं असावें कथाकीर्तन ।
पोथीपुराणांचें वाचन । हेंचि शिकविण्या गांवासि ॥१३॥

नाना दृष्टांत कथा अनंत । सांगोनि मानवां करणें उन्नत ।
याचसाठी ग्रामगीतेचेंहि गीत । गायिलें आम्हीं ॥१४॥

नको उगीच अवडंबर । आपुलें जीवन करावें सुंदर ।
गांवीं फुलवावें सुखाचे अंकुर । हेंचि कर्तव्य मानवाचें ॥१५॥

मनुष्य निरोगी सात्विक बनावा । त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा ।
त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा । कोणासहि ॥१६॥

हेंचि शिकणें असतें पोथींतूनि । भजनांतूनि कीर्तनांतूनि ।
याचसाठी हीं साधनें योजूनि । ठेविलीं संतीं ॥१७॥

साधनांत साधन-रचना । मुख्य दृष्टि राष्ट्रीय जाणा ।
साधूनि मानवतेच्या अनुसंधाना । जन लावावे सुमार्गीं ॥१८॥

त्यासाठी तात्त्विकता दावावी । वरकड उपांगें समजावोनि द्यावीं ।
आवश्यक तीं साधनें लावावीं । आपुल्या गांवीं ग्रंथादि ॥१९॥

ग्रंथ ओवीबध्दचि असावे । हेंहि म्हणणें सोडोनि द्यावें ।
सहज कळेल तेंचि उत्तम समजावें । गद्यपद्य ॥२०॥

कांही ग्रंथ ऐतिहासिक । कांही चरित्रें, कांही तात्त्विक ।
कांही अभंग पुराणें सम्यक । पठणीं ठेवावीं ॥२१॥

उगीच भरले चमत्कार । पूजापातीचा डोंगर ।
जीवनाचें कांहीच सार । नसेल तें काय कामीं ? ॥२२॥

प्रसादासाठी पोथी लाविली । चमत्कार ऐकतां वेळ गेली ।
आपुली बुध्दि गहाण पडली । ऐसें न व्हावें यापुढे ॥२३॥

रूपकात्मक पूर्वीचें ग्रंथ । जनसाधारण भुलले तेथ ।
काढूं लागले उलटा अर्थ । विश्वास सहसा बसेना ॥२४॥

पदोपदीं ऐसें उदाहरण । ग्रंथ वाचूनि बिघडे मन ।
अर्थ न लागतां वेडावून । जाती जन भाविकहि ॥२५॥

मी हरिविजय ग्रंथ ऐकला । कथिलें, नारद नारदी झाला ।
साठ पुत्र देवोनि गेला । एके रात्रीं ॥२६॥

ग्रंथ ऐकिला पांडवप्रताप । थोरथोरांचें कथिलें पाप ।
व्यभिचाराचें लागलें माप । आपोआप जेथे तेथे ॥२७॥

कुणाचा जन्म कानांतून । कोणी जन्मला तोंडांतून ।
कोणी झाला घागरीमधून । ऐसेंहि ग्रंथीं ऐकियलें ॥२८॥

शिंपींतून कोणी जन्मास आला । कोणी जटेंतूनचि जन्मला ।
कोणी लघवी करितां उध्दरोनि गेला । शिवलिंगावरि ॥२९॥

कोणी प्रसाद टाकोनि जात । म्हणोनि नांव बुडे पाण्यांत ।
प्रसाद घेतांचि वरि येत । जैसीच्या तैसी ॥३०॥

कोणी पृथ्वी घेवोनि पळाला । सागराइतुकी लघवी कुणाला ।
कुणाच्या नाकीं गर्दभ चरला । झोपीं जातां ॥३१॥

ऐसे ग्रंथीं चमत्कार । कान धरोनि सांगा अपार ।
परि मन न माने क्षणभर । काय करावें त्यालागी ? ॥३२॥

हे जरि ऐसेचि ठेविले । तरि अर्थ सांगणारे पाहिजेत भले ।
त्यांनी तर स्वर्गासहि नाचविलें । दोन बोटांवरि ॥३३॥

म्हणती जनहो ! ऐसेंचि आहे । येथे संशय धरूंचि नये ।
नाहीतरि पाप निरय । भोगणें पडे सर्वासि ॥३४॥

मानव करावया आदर्श । हाचि काढिला निष्कर्ष ।
सर्व चमत्कारांचा सारांश । तो ग्रंथराज ठरविला ॥३५॥

जो ऐकेल भावना धरोनि । तयास स्वर्गमुक्ति लाभे क्षणीं ।
ऐसें सांगोनि स्त्रीपुरुषजनीं । समाज केला पांगळा ॥३६॥

विचारें संशयासि जागा वाढली । समाधान-वृत्ति भंगली ।
नाही कोणी समजावोनि दिली । रोचक रूपक वाणी ती ॥३७॥

पुराणिक म्हणती उगेंचि ऐकावें । ’ होय ’ म्हणूनि नम्र व्हावें ।
तरीच जीवा उध्दार पावे । संशयात्मे विनाशती ॥३८॥

हें साधुसंतांनी जाणलें । म्हणोनि विवेकग्रंथ निर्माण केले ।
त्यांत हे संशयचि फेडले । बहुजन समाजाचे ॥३९॥

भाविक जनासि लावावया वळण । आकळावया सकळ ज्ञान ।
संतमहंतांनी उपकारऋण । केलें असे आम्हांवरि ॥४०॥

संस्कृतांतूनि काढूनि सार । सुलभ केलें प्राकृत ग्रंथभांडार ।
जनसाधारणासीहि कळावे सविस्तर । उध्दार मार्ग म्हणोनिया ॥४१॥

पुरातन संस्कृत ऋषि-बोली । त्यांतूनि बहुविध भाषा जन्मली ।
तैसीच मराठीहि वाढविली । संतकविराजें ॥४२॥

संत ज्ञानदेव मुकुंदराज । चक्रधर नाथादि हंसराज ।
यांनीच सुलभ केलें सहज । ज्ञान प्राकृत ग्रंथांतरीं ॥४३॥

समर्थ रामदासादि झाले । मुक्तेश्वर मोरोपंतादि भले ।
गीत अभंग गाथे लिहिले । महाराष्ट्र-ग्रंथकर्त्यांनी ॥४४॥

महाराष्ट्रीं संतकवि-परंपरा । तैसाचि चरित्रग्रंथांचा पसारा ।
वळणीं लावावया समाज सारा । ग्रंथ लिहिले बहुतांनी ॥४५॥

स्वामी विवेकानंदादि संतीं । जुन्यानव्यांची वाराया भ्रांति ।
ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथीं । नाना भाषांमधूनि ॥४६॥

त्या सर्वांतूनि शोधूनि घ्यावे । जे तात्त्विक बोधग्रंथ स्वभावें ।
कर्मठतेच्या भरीं न भरावें । अथवा शुष्क पांडित्याच्या ॥४७॥

आपली पात्रता ओळखोन । समाजाची पातळी लक्षून ।
आदर्शाचें सुलभ होय ज्ञान । ऐसेचि ग्रंथ वाचावे ॥४८॥

ग्रंथ वाचतांहि तारतम्य ठेवावें । कोणत्या ग्रंथांतून काय घ्यावें ।
काय सोडावें काय आचरावें । उन्नतीसाठी आपुल्या ॥४९॥

बोलकें ज्ञान सांगण्यासाठी । ग्रंथ वाचले उठाउठी ।
तेणें आत्मघात होतो शेवटीं । शांति तिळभरि लाभेना ॥५०॥

सखोल अध्यात्माचे ग्रंथ । त्यासाठी बुध्दीहि पाहिजे समर्थ ।
आणि उमगला पाहिजे कर्तव्यपथ । अर्जुनापरी ॥५१॥

एरव्ही हजारो ग्रंथ वाचले । त्यांतील मर्मचि नाही कळले ।
तरि तें वाचणें वाउगेंचि गेलें । वेडयापरी ॥५२॥

वेडा बोलूनि फार गेला । परि त्याचा अर्थचि नाही उमगला ।
म्हणोनीच तो वेडा ठरला । लोकांमाजीं ॥५३॥

बोलेल जें कांही वाचेने । तारतम्य ठेवोनि विवेकाने ।
वर्तेल तैसाचि जीवेंप्राणें । त्यासचि म्हणती मानव ॥५४॥

जो फार बोलूनि जातो । परि एकावरि न निश्चित राहतो ।
त्यासचि वेडा आम्ही म्हणतों । आपुल्या विचारें ॥५५॥

लोकीं हाचि घुसला वेडेपणा । त्याने धर्माचा केला धिंगाणा ।
माणूस दिसला भाविक शहाणा । तरी तो पाहतां वेडाचि ॥५६॥

मज भेटला ऐसा एक सज्जन । म्हणे ऐकाल काय माझें कथन ?
मीं केलें ग्रंथवाचन । बारा वर्षे ज्ञानात्मक ॥५७॥

ब्रह्मसूत्रें उपनिषदें पुराण । वाचलें भागवत अध्यात्मरामायण ।
तरीहि ब्रह्मज्योतीसि अजून । देखिलें नाही ॥५८॥

आता किती पारायणें करावीं । जेणें कळेल ब्रह्मचवी ?
सांगाल काय खूण बरवी । विशद करोनिया ? ॥५९॥

मीं तयाशीं विनोद केला । म्हणालों, कसे पावाल परमार्थाला !
त्यासाठी पाहिजे खल केला । सदग्रंथांचा ॥६०॥

ग्रंथ टाकावे बारीक खलून । चूर्ण सकाळीं घ्यावें दुधांतून ।
अथवा पाण्याचेंहि अनुपान । चालेल शिळया ॥६१॥

त्या गृहस्थाने घरीं जाऊन । ग्रंथ फाडले दणादण ।
खल घातला चूर्णप्रमाण । बाह्यबुध्दि तयाची ॥६२॥

सकाळीं येवोनि विचारी । किती दिवस प्यावें तरी ?
सांगाल काय कैशापरी । घेत जावें घोळूनि हें ? ॥६३॥

मी म्हणालों, वारे बुध्दि ! अंधानुकरणा धावे आधी ।
तारतम्य नसतां सांगा कधी । अनुभव येईल वाचका ? ॥६४॥

अरे ! तुज हेंहि नाही कळलें । ग्रंथ फाडोनि चूर्ण केलें ।
याने का ज्ञान अनुभवलें । जाईल बाबा ? ॥६५॥

तो म्हणाला, आम्हांसि काय ? कोणी सांगेल तैसा करावा उपाय ।
ऐसींच पारायणें केलीं, संवय । रोज रोज लावूनिया ॥६६॥

कळलें नाही ब्रह्मसूत्र । उपनिषद पंचीकरण विचारसागर ।
वाचले मुखें भराभर । सविस्तर टीकाग्रंथ ॥६७॥

आता कुठवरि पाठ करावें ? मनें धरिलें आपणांस विचारावें ।
शंका धरोनि आलों जीवें । आपणापाशी ॥६८॥

आपण सांगितलें चूर्ण करा । तैसेंचि केलें जाऊनि घरां ।
आलों पुढलिया विचारा । घेण्यासाठी ॥६९॥

कुणीकडे तोंड करावें पिण्यांत ? सांगाल तैसें घेऊं सतत ।
मी म्हणालों, वारे श्रध्दावंत ! अंधानुकरणी लोक हे ! ॥७०॥

बाबा ! मीच खरा चुकलों । तुझ्याशीं विनोद करोनि ठकलों ।
पाहावयासि होतों लागलों । बुध्दि तुझी ॥७१॥

एवढे ग्रंथराज वाचोन । किती आलें तारतम्यज्ञान ।
याचें समजलें मज धोरण । तुझ्या कृतीवरोनि ॥७२॥

कर्मठ अंधानुकरणी बुध्दि । त्यासि ब्रह्मज्ञान नको आधी ।
शुध्दता अंतर्मुखता साधी । लागेना अवधि तया मग ॥७३॥

म्हणोनि सांगतों खरें ऐक । ग्रंथीं वाचावें चारित्र्य सम्यक ।
राहणी कळेल ज्यांत उदबोधक । रोजच्या व्यवहाराची ॥७४॥

कधी उठावें कधी झोपावें । कैसें स्नान, ध्यान करावें ।
कोणतें कर्म आचरावें । पुण्यश्लोक व्हावया ॥७५॥

कोणत्या भावें उद्योग करावा । कोणाचा उपदेश ऐकावा ।
किती घ्यावा किती सोडावा । विचार-बळें ॥७६॥

हेंचि पठन आधी करावें । मग कर्तव्य-तत्पर व्हावें ।
पुढे पुढे अनुभवीत जावें । ज्ञान-पुढील मार्गाचें ॥७७॥

ऐसे अनुक्रमें ग्रंथ वाचावे । तरीच ज्ञान संपादावें ।
एरव्ही पारायणें करीत मरावें । काय होतें तयाने ? ॥७८॥

शास्त्रप्रचीति गुरुप्रचीति । मगचि होते आत्मप्रचीति ।
या म्हणण्यासीच आहे निश्चिती । अनुभवाअंतीं ॥७९॥

संतीं कथिलें शास्त्रपठन । तें सदग्रंथांसि उद्देशून ।
परि अधिकारपरत्वेंचि वाचन । सफल जीवन करीतसे ॥८०॥

एरव्ही ग्रंथभांडार बहुत । नाना विध्दानांचें बहु मत ।
कोणतें निवडावें समजोनि त्यांत । आपणासाठी ? ॥८१॥

नाना अधिकारांचे नाना ग्रंथ । अधिकारपरत्वें असती संमत ।
आपला कोणता मार्ग त्यांत । निवडोनि घ्यावा ? ॥८२॥

हें तों समजणें आपल्या आधीन । कळावी अधिकारपात्रता पूर्ण ।
हेंहि समजण्याचें ज्ञान । ग्रंथींच आहे दाविलें ॥८३॥

मूर्ख पढतमूर्ख विवेकी शुध्द । बध्द मुमुक्षू साधक सिध्द ।
ग्रंथींच दाविला पात्रता-भेद । उन्नतिमार्गासहित ॥८४॥

आपणासि कोण रोग जडला । निश्चित कळावा ज्याचा त्याला ।
त्याचि रोगाचा उपाय केला । पाहिजे आधी ॥८५॥

परि जो आपणासि ओळखूं नेणे । त्यासि सहाय्य लागे देणें ।
त्यासाठी पाहिजे साक्ष घेणें । संतसज्जनांची ॥८६॥

नाहीतरि ग्रंथीं सर्वचि विषय । कोणी उपाय कोणी अपाय ।
अवस्थाभेदें हें सर्व होय । साधक-बाधक ॥८७॥

यासाठी हवी सत-संगति । ज्यासि नाही सूक्ष्म मति ।
कुणी आपुल्याच विचारें चढती । आत्मानुभूति पावावया ॥८८॥

कोणी संस्कारचि घेवोनि आला । कोणी येथे शिकोनि रंगला।
कोणास कांहीच न कळे बोध भला । संतानुभवाचा ॥८९॥

म्हणोनि ग्रंथ वाचावे त्याने । मन लावोनि अर्थ समजणें ।
हें अनुभवियांकडोनि निवडणें । आपुल्यासाठी ॥९०॥

ग्रंथांचें भरलें महाभांडार । त्यांतूनि निवडती निवडणार ।
सार तेवढें देती साधकांसमोर । संतसज्जन ॥९१॥

मुळांत सारचि संतांची वाणी । जनासि तारी मार्ग दावूनि ।
ग्रंथ ही शब्दमूर्तीच ज्ञान-खाणी । दिव्य संतांची ॥९२॥

परि तयांचा लावितां अर्थ । सामान्य बुध्दि पडे भ्रमांत ।
काल बदलोनि होतो अनर्थ । तारतम्य न कळतां ॥९३॥

यासाठी देशकालानुसार । ग्रंथांचें उकलोनि दावावें अंतर ।
ऐसा असतो अधिकार । पुढील संतांचा ॥९४॥

साधुसंत अनुभवाचे सागर । त्यांना कळतो पुढील व्यवहार ।
जीवांचा कैसा होय उध्दार । काय करावें त्यालागी ॥९५॥

कोणास काय साधन द्यावें । हें त्यांसीच कळे स्वभावें ।
म्हणोनि गुरुप्रचीतीस घ्यावें । बोललों आम्ही ॥९६॥

कोणते ग्रंथ कोणी वाचावे । संतीं कथियलें तें बरवें ।
सदाचार नित्यनेम घ्यावे । वाचोनि आधी ॥९७॥

झोपावें उठावें ठरल्या वेळीं । आपुलीं कामें करावीं सगळीं ।
कोणा दु:ख न व्हावें भूमंडळीं । आपणासाठी ॥९८॥

आपुलें कर्म संपवोनि सगळें । जो दुसर्‍याच्या सेवेसि वळे ।
तोचि चढे कार्य-बळें । लौकिकासि आणि उन्नतीसि ॥९९॥

ऐसे विचार जया ग्रंथीं । तेचि प्रथम वाचावी पोथी ।
ठेवोनि लक्ष मुख्य अर्थी । जीवा उन्नतिपदा न्याया ॥१००॥

जयास व्यवहार समजला पूर्ण । सक्रिय कळलें साधनाज्ञान ।
तेणेंच ब्रह्म कोण आत्मा कोण । समजावें हें ग्रंथपठनीं ॥१०१॥

समजोनि घ्यावें पंचीकरण । आत्मअनात्म ब्रह्मविवरण ।
कळल्यावरि नेघे मन । मिथ्याभ्रांतिविषयीं आशा ॥१०२॥

मगचि खरें श्रवण मनन । निदिध्यास वाढेल मनापासून ।
तेणें साक्षात्काराची खूण । कळेल ठायीं आपुल्या ॥१०३॥

साक्षात्कार ब्रम्हज्योति । होईल आत्मानंदाची प्राप्ति ।
आत्मरंगें विलीन वृत्ति । ब्रह्मामाजीं होतसे ॥१०४॥

जयाची दृष्टि ऊर्ध्व झाली । विषयांतूनि उन्मनींत गेली ।
त्याची समाधि सुखें डोलली । अखंडाकार ॥१०५॥

देवभक्त नाही दुजे । कळलें अनुभवाने सहजें ।
विश्वीं विश्वाकार होइजे । ऐसें झालें मग तेथे ॥१०६॥

ग्रंथवाक्याने वृत्ति चढली । गुरुबोधाने अनुभवीं वळली ।
आत्मरुचीने तदाकार झाली । अखंड जैसी ॥१०७॥

मग कशाचें ग्रंथवाचन ? जें जें करील तेंचि समाधान ।
जें बोलेल तेंचि ग्रंथज्ञान । होईल स्वयें ॥१०८॥

हर्ष नाही जन्म घेतां । दु:ख नाही मृत्यु होतां ।
अंगीं बाणे स्थितप्रज्ञता । कैवल्यरूप तयाच्या ॥१०९॥

याचि पूर्ण सुखासाठी । ग्रंथ वाचणें उठाउठी ।
जीवनाची पूर्णता शेवटीं । यांतचि आहे ॥११०॥

ही आत्मप्रचीति पावावयासि । हाचि मार्ग आहे साधकासि ।
प्रथम सदग्रंथ-अवलोकनासि । केलें पाहिजे ॥१११॥

एरव्ही जो पूर्वीच उमगला । त्यास नकोचि हा गलबला ।
तो सरळचि आत्मप्रचीतीसि गेला । समाधानें ॥११२॥

आत्मप्रचीति म्हणजे दिव्यदृष्टि । ज्यांत व्यष्टि, समष्टि आणि परमेष्टि ।
आपणचि अनुभवतो उठाउठी । अगणित रूपें एकपणें ॥११३॥

असो देव, संत, मानव । पापी, पुण्यवान सर्व ।
मूळरूपाचा घेतां अनुभव । चैतन्यघन विश्वचि ॥११४॥

ऐसा अनुभव ज्याने घेतला । तो विश्वाच्या उपयोगा आला ।
त्याचा व्यवहार व्यापक झाला । सकळासाठी ॥११५॥

याचि भावें जनसाधारणासि । ग्रंथ द्यावेत वाचावयासि ।
त्यानेच लागेल मार्ग त्यांसि । विश्वरूप-दर्शनाचा ॥११६॥

परंतु ज्यांसि व्यवहारपात्रता नाही । त्यांनी करावी अध्यात्म-घाई ।
हें तों होईल अनाठायी । ग्रंथपठन एकांगी ॥११७॥

शुध्दाचरण मागाहूनि वाचलें । पहिले वेदान्तपठन केलें ।
वळणीचें पाणी वरि चढविलें । होईल ऐसें ॥११८॥

शब्दें म्हणतील ’ सर्व ब्रह्म ’ । मना आलें तें करितील कर्म ।
नास्तिकतेहूनि महाभ्रम । माजेल लोकीं शब्दज्ञानें ॥११९॥

गांवीं दु:खांची पेटली आग । तो म्हणेल ’ सच्चिदानंद जग ’ ।
हें सर्व बहुरूप्याचें सोंग । वाटेल जना वेडयापरी ॥१२०॥

यास्तव गांव होईल शुध्द । प्रेम, ज्ञान, सत्य आनंद ।
सर्वांस लाभेल ऐसे सुबुध्द । ग्रंथ गांवीं लावावे ॥१२१॥

होईल जीवनाची उन्नति । ज्ञानविज्ञानाची प्रगति ।
ऐसीच असावी ग्रंथसंपत्ति । गांवोगांवीं ॥१२२॥

सर्वांस कळावें कर्तव्य आपुलें । कैसें होईल सर्वांचें भलें ।
तनमनधनें फळेफुले । विश्व हें कैसें, कळावें ॥१२३॥

आम्ही रहिवासी सर्वचि मुळचे । विश्वरचाना हें नाटक आमुचें ।
आपुल्या परीने रंगविणें साचें । आहे आम्हां ॥१२४॥

ऐसें जाणोनि स्वरूपासि । वर्ते तो जिंकी या खेळासि ।
तुकडया म्हणे हेंचि कळावयासि । कथिली असे ग्रामगीता ॥१२५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
ग्रंथपठनाचा कथिला भावार्थ । चाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१२६॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥