वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय एकेचाळीसावा

ग्रामगीता

अध्याय एकेचाळीसावा : ग्रंथ-महिमा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव ।
विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥

यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । 
ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥

ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर । 
सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥

ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । 
तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥

ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । 
ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥

चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ । 
करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥

म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां । 
वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया ॥७॥

परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करितां पारायणा । 
ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥

माझ्या मतें हें अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन । 
आधी शिकावें अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥

प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान । 
आपुलें वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥

असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली । 
नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ? ॥११॥

काय वाचतो याचें ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण । 
श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥

कोठे थांबावें वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि । 
कोठे रंगवावें गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥

ऐसें जंव कळलेंच नाही । केलीं पारायणें सर्वहि । 
लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन ॥१४॥

वाचतांनाचि बोध होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो । 
कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥

ऐसें वाचन आधी शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें । 
मग आपणासि ओळखीत जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥

वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील । 
नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥

मुखाने ग्रंथ वाचावे । घरीं विपरीत आचरावें । 
तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥

मुखें वाचतो ’ सत्य बोलावें ’ । परि सत्य करणेंचि नाही ठावें । 
म्हणे ’ मज सत्यवान म्हणावें ’ । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥

मी तों धनावरचा सर्प बरवा । परि मला ’ उदार दाता ’ गौरवा । 
ऐसें कोण मानील आपुल्या गांवां ? सांगा सांगा ॥२०॥

रंजल्यासि न दे पाणी । म्हणे ’ मज म्हणा दानशूर राणी ’ । 
ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥

पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला । 
हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ’ व्यसनें सोडा ’ बोलतां ॥२२॥

एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला । 
परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने बाइलेसि ॥२३॥

ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति ! 
तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥

ऐसें न व्हावें आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी । 
आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥

उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल । 
श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि ॥२६॥

वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक । 
जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥

म्हणोनि हेंचि वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें । 
तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण ग्रामजीवनाचें ॥२८॥

येथे श्रोत्यांनी विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें । 
परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि फलदायी ॥२९॥

कोणी म्हणती ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्र, धन । 
होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या ॥३०॥

कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा । 
म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचतां ॥३१॥

कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा । 
मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥

कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी । 
याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ? ॥३३॥

याचें उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण । 
ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन दावूनि ॥३४॥

त्यांत एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं । 
त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥

कानीं पडो एकचि वचन । परि त्यांत असे महापुण्य । 
हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी ॥३६॥

नुसत्या पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व । 
कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥

कराया सांगितलें जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन । 
क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥

म्हणोनि मी या सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों । 
तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥

घोडयासि पाणी दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें । 
पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें ॥४०॥

ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले । 
कोण्या तोंडाने मागावें भलें । फळ तयांसि ? ॥४१॥

कांही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना । 
त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां हातामाजीं ॥४२॥

ग्रंथीं अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली । 
हजारो लोकांनी आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥

ग्रंथीं सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी । 
आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें ॥४४॥

कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति । 
घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥

व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती । 
नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥

कांही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी । 
सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥

लोकहि असती आसक्त बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे । 
धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥

फळ न लाभतां मग चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति । 
रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥

पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना । 
काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ? ॥५०॥

घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा । 
भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥

कलकत्त्याच्या गाडींत बसावें । आणि म्हणे ’ देवा ! पंढरीसि न्यावें ’ । 
ऐशा प्रार्थनेसि फळ यावें । कोण्या प्रकारें ? ॥५२॥

एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती । 
ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना ॥५३॥

शेवटीं पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला । 
तो पुसतो आपुल्या गुरुला । ’ साधन सांगा सुटण्याचें ’ ॥५४॥

गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी । 
शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी ॥५५॥

लावी देवीचें पुराण । करी नेटाने सत्यनारायण । 
आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तूं ॥५६॥

त्याने तैसेंचि सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले । 
बुवाब्राह्मणा धन उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥

शेवटीं पडला कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी । 
त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥

वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति । 
काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥

बिचारा चोरी करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना । 
काय करिती गुरु, ग्रंथ नाना ? वाचणारा लबाड हा ॥६०॥

ऐसें जन्मभरि साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले । 
याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें साधन त्यांचें ॥६१॥

ऐसें कासयासि करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें । 
आपण बुडावें दुसर्‍या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥

सांगणाराने तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें । 
तेव्हाचि फळ अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥

हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना । 
हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥

हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून । 
जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें होतसे ॥६५॥

ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि । 
समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥

ही नव्हे फुलें टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि । 
आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही ग्रामगीता ॥६७॥

कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापें तापला । 
कोणी असहाय्यपणें संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥

कोणी अन्यायें लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी । 
देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें ॥६९॥

याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम । 
सुखशांति लाभेल करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥

अल्पबुध्दि जाईल विलया । वाचतां ज्ञान होईल तया । 
खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि ॥७१॥

प्रेम आजवरि होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें । 
सर्वांभूतीं दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥

द्वेषबुध्दीचें अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन । 
सत्कार्य कराया धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥

ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान । 
दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥

ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला । 
त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि ॥७५॥

सामुदायिक वाढली वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति । 
ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥

ग्रामगीतेंतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून । 
त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥

आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हातीं फडा । 
रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥

कार्यास लागतां तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं । 
चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ त्याचा ॥७९॥

एकांतीं बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां । 
जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥

ऐसें घर आदर्श झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें । 
मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥

हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला ! 
आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥

ग्रामगीतेचें फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि । 
उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता ॥८३॥

एक एक साधन वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां । 
केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥

ग्रामगीतेंतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना । 
ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥

नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति । 
समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥

सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था । 
साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि ॥८७॥

गायीगुरांची वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा । 
दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥

विवाहादि सर्व संस्कार । समाजीं होतील सुखकर । 
मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥

स्त्रिया-मुलें होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन । 
ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां ग्रामगीता ॥९०॥

भिकारी बेकारी गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा । 
सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥

आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण । 
अन्याय, व्यसनें, कारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥

गांवीं वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना । 
नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥

ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी । 
परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥

जी जी इच्छा कराल मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि । 
यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥

येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा । 
जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥

मी पंडित नोहे आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई । 
ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारें ॥९७॥

माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी । 
चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥

जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें । 
तैसेंचि दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥

म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो । 
या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥

भगवदगीतेचें हें सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप । 
अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥

गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला । 
राहूं नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥

मी तों केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं । 
म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥

श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली । 
परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥

ग्रामगीतेंत ज्यांचीं नांवें, चित्रण । त्या सर्व संतांचेंचि सहवरदान । 
ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥

ग्रामगीता माझें हृदय । त्यांत बसले सदगुरुराय । 
बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥

शब्दरचना गावंढळ । हें मी समजतों मनीं प्रांजळ । 
दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥

वालुकापात्रीं गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ । 
तैसें वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥

आमचें गांवचि मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले । 
ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥

घरोघरीं पंडित कुठले ? आहेत तेहि विकृत झाले । 
पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥

जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम । 
ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥

क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून । 
त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी अंत:करणें ॥११२॥

ऐसियांसीच पंडित मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें । 
त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥

धुंडाळूं नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि । 
आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥

जो ग्रंथहि प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो । 
वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती ॥११५॥

ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशींचा । 
तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥

पंडितांनी वाचूं नये । ऐसें माझें म्हणणें नोहे । 
परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥

पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन । 
समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥

ग्रामीं विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण । 
सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि ॥११९॥

जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल ।
मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥

जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति । 
वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥

जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें । 
तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥

पाप म्हणजे बिघाड करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें । 
पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि ॥१२३॥

ऐसें नसावें वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें । 
तैसेंचि वर्ततां वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥

ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण । 
ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें वक्त्याने ॥१२५॥

ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य । 
प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ । 
घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥

ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता । 
प्रमाण द्यावें कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥

ज्याचे हातीं हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला । 
वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥

मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून । 
कळत नसतां घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥

उत्तम उपदेश हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला । 
तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥

प्रथम ऐकावें हें गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन । 
मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥

प्रथम श्रध्देने वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे । 
उठतां बसतां कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥

यांतचि माझें समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन । 
पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥

संपोनि जातील भेदवाद । नांदेल गांवीं प्रेम शुध्द । 
लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥

मानवांतील असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व । 
जीवनीं संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥

निसर्ग साह्य दे वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं । 
जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न सोडतां ॥१३७॥

आरोग्य होईल सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान । 
कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥

समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना । 
प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥

शोषण अथवा शासन । यांचें गळोनि पडेल बंधन । 
नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता ॥१४०॥

दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप । 
गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥

स्वर्गींचे अमर हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं । 
ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती वनांतरां ? ॥१४२॥

सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव । 
ऐसिया गांवा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥

त्यांच्या बोधें धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति । 
त्यांच्या प्रभावें शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥

ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति । 
देवचि गेला बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥

उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर । 
त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥