(चाल : तेचि खरे हो ! अनुभवयोगी...)
भूक मला श्रीगुरु-चरणाची,
आणिक जाणे काहि न मी ॥धृ.॥
नको मला स्वर्गादिक सुख ते, नाशवंत म्हणती संत ।
गर्भवास घेउनिया जागा, गुरुचा सेवक होइन मी ॥१॥
कोणी जाती मथुरा-काशी, प्रयाग -बदरी-द्वारवती ।
सेवुनि चरण अखंड तयाचे, आनंदे गुण गाइन मी ॥२॥
जप-तप, नेम- अनुष्ठानहि ते, स्वर्गा मोक्षा जायासी ।
तुकड्यादास आस ही मागे, आडकुजीला नित्य नमी ॥३॥