वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण सहावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण सहावे

अजपाजप

श्रवण करी माझिया राया ! 
 तुज सांगेन सुगम उपाया ।
जये श्रीकृष्णे व्यवसाया । लाविले उद्धवासी ॥१॥

तोचि शुकाने परीक्षितासी । आणिक नारदे वाल्मीकासी ।
वशिष्ठे सांगितला रामासी । तोचि सांगेन उपाय आता ॥२॥

जैसा सांगेन तुज उपाय । श्रद्धा ठेवोनि करीतु जाय ।
जेवि मातेचे गोड गोड पेय । पीतसे तान्हुला ॥३॥

तुज फारचि आहे गोडी । तरि हा उपाय करी तातडी 
चालता पायाचेनि जोडी  वाट लाघे साधनाची ॥४॥

उत्तम मार्ग हा सोडून । कासया फिरसी रानोरान ? 
या प्राणियांसी सांगे कवण ? । करिती मना आले ते ॥५॥

खरोखरी ज्या मानवाची । इच्छा असेल गा तरावयाची 
तेणे सावकाश हाचि । उपाय करावा ॥६॥

म्हणती देव पहाडी लपला । तो एका साधूने पाहिला 
कैसा मिळेल आम्हाला । ओरडती ऐसे ॥७॥

मागे तरले बहुत जन । तिथे उपाय केला कवण ? ।
याच उपाये करून । सर्वहि तरले जाण पां ॥८॥

किती सांगू त्यांची नावे । नामा धृव, प्रल्हाद बरवे ।
सांदिपने कृष्णासी सांगावे । आदिनाथे मच्छेंद्रा ॥९॥

कोणी सांगती बाह्य नाम । म्हणती म्हणा राम-राम ।
त्या नामेंचि कल्पद्रुम । फळे म्हणती ॥१०॥

जेथे न उरे कल्पना । तोचि राम तुझिया नयना ।
परंतु तू अज्ञाना ? । भुललासी अंतरंग ॥११॥

अज्ञानत्व ठेवोनिया अंगी । अहंकारे राहिले जगी ।
बुडाले याने कितीक जोगी । विचार करी रे ॥१२॥

सत्य न अनुभविता मनी । बहु बोलले असत्य भाषणी ।
सत्य-असत्य विचार जनी । पाहा पाहा बापा रे ! ।॥१३॥

सत्य टाकोनि असत्य धरी । तो नर जाईल यमपुरी ।
यांत काही कलाकुसरी । नलगे सांगावी ॥१४॥

अरे ! ठेवी सत्यपण । असत्य सांडी सांडी जाण ।
सत्य ईश्वरा प्रमाण । संत वदती निश्चये ॥१५॥

तरी आता बा साधक ! । प्रथम सांगेन ते ऐक ।
सदगुरु-चरण धरोनि घोक । अजपा सदा अंतरी ॥१६॥

हिला अजपा का म्हणती । ते सांगो पुढत पुढती ।
जप हृदयांतरी चालती । आपोआप, न जपता ॥१७॥

म्हणती यास निरंजनमाळ । भजेल जो त्यास कांपे काळ ।
जरी प्रपंचाची हळहळ । तरी दूर होय ॥१८॥

ओहं-सोहं-नाम असे । ओहं (ॐ) नाभीपासोन प्रकाशे।
उमटती तयाचे ठसे । कंठावरी ॥१९॥

सोहं नासिकेशी वसत । श्वासरूपे उंच जात ।
हा दोन्हीचा एकांत । अंत विशुद्ध चक्री ॥२०॥

जप चाले आपणाआपण । करोनि थोर एकाग्र मन ।
ओळखोनि परिपूर्ण । लक्ष ठेवी अधर कंठी ॥२१॥

यापुढे गड्या ! काही । शुद्ध नाम दुजे नाही ।
याचि नामे जाशील पाही । पैल पंथा अभ्यासे ॥२२॥

येणे होईल आत्मशोधन । पुढे षड्चक्रदर्शन ।
जप एकवीस हजार सहाशे जाण । अहोरात्री ॥२३॥

टाकोनिया मार्ग खरा । मारता उगाचि येरझारा ।
तेणे केवि चौऱ्यांशी-फेरा। चुकेल तुमचा ? ॥२४॥

आता करी नामोच्चार । पाहोनिया एकांत सुंदर ।
तेथे बैसे सविस्तर । पद्मासन घालोनि ॥२५॥

जप चालतसे अपार । ओळखी, करोनिया मन एकाग्र ।
उन्मेष वृत्तीचा सार । लाभेल तेथे ॥२६॥

लागे तेथे सहज समाधी । स्मरता अजपा तुटे उपाधि ।
प्रपंचातहि विघ्न न बाधी । ऐसे नाम सुंदर सोहं-हंसा ॥२७॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षष्ठम प्रकरण संपूर्णम् ॥२८॥