वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय एकोणतिसावा

ग्रामगीता

अध्याय एकोणतिसावा : दलित-सेवा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतीं शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । 
परंतु ’ परधर्म भयावह ’ बोली । गर्जविली गीतेने ॥१॥

स्वधर्मी मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय । 
मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥

ऐका ग्रंथींचा दाखला । परधर्म भयावह जरी ठरला । 
तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥

हिंदु बुध्द मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन । 
ऐसें नव्हतें नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥

भिन्न धर्मांचा जन्महि नव्हता । मग परधर्म कां सांगे गीता ? 
तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानीं तियेच्या ॥५॥

एकाची प्रकृति ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेंचि । 
त्यासि गुणकर्में दुसर्‍याचीं । साधती केंवि ? ॥६॥

कोणात शक्ति कोणांत युक्ति । कोणांत ज्ञान, सेवावृत्ति । 
साधे त्याचि साधनें करावी भक्ति । जनताजनार्दनाची ॥७॥

त्याने आपल्या प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी । 
दुसर्‍याचें कर्तव्य घेतां शिरीं । विनाश त्याचा ॥८॥

म्हणोनि परधर्म भयावह । ऐसें कथिलें नि:संदेह । 
तुपांत नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि उत्तम जरी ॥९॥

स्वधर्म म्हणजे आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम । 
यासाठीच करणें जीवनाचा होम । श्रेयस्कर हें सर्वां ॥१०॥

असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार । 
हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥

आत्मवश तें तें सुख । परवश परतंत्र तें दु:ख । 
ऐसेंहि धर्मग्रंथीं अनेक । कथिलें थोरांनी ॥१२॥

परधर्म म्हणजे विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता । 
हें समजण्याचें तत्त्व हातां । दिलें तयांनी ॥१३॥

आपुला म्हणोनि हृदयीं धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा । 
ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥

मुसलमान म्हणतां मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकूनि द्यावा । 
आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥

कोणी म्हणती आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु । 
ख्रिश्चनासि कधी न वंदूं । भाऊ म्हणोनि आपुला ॥१६॥

मी म्हणतों वंदन गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ? 
हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान कां द्यावा ? ॥१७॥

मुसलमानाचें उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन ।
हें कोणीं दिलें न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥

ख्रिश्चन दूरदेशाहुनि आला । सेवा करतां करतां मेला । 
त्याने जरि धर्म नाही बिघडविला । तुमचा कांही ॥१९॥

तरी त्यासि तुम्हीं अव्हेरावा । हें म्हणणें नाही पसंत जीवा । 
तो आपुलाचि म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥

जो कोणी सत्य सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति । 
तो असो कोणत्याहि धर्मजमातीं । समजावा चित्तीं आपुलाचि ॥२१॥

धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती । 
न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥

परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली । 
तेणें धर्मपंथांत फूट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥

मूळतत्त्वें विलया गेलीं । महंती-बुवागिरी वाढली । 
सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगें ॥२४॥

ऐसा प्रकार होत आला । म्हणोनि खरा धर्म मातींत मिळाला । 
आतां उठणेंचि त्या धर्माला । कठीण झालें ॥२५॥

गुणकर्मांचा लोप झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ? 
गोंधळोनि समाज गेला । गर्तेमाजीं भेदभ्रमें ॥२६॥

’ विष्णुमय जग ’ हाच स्वधर्म । ऐसें संतीं कथिलें वर्म । 
तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥

’ मानव ’ हेंचि आपुलें नाम । मग स्वधर्म म्हणजे ’ मानवधर्म ’ । 
हें तरी ध्यानीं घ्या सत्य वर्म । साध्या बोलीं ॥२८॥

आपण आहोंत मानव । मानव्याचा वाढवावा गौरव । 
सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेंचि कार्य आपुलें ॥२९॥

मज मान्य धर्म न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति । 
करी जो समाजाची धारणास्थिति । समान भावें ॥३०॥

हें जोंवरि वर्म नेणें । तोवरि धर्म हो कोणी म्हणे । 
ती अपूर्णतेचीं धर्मलक्षणें । समजों आम्ही ॥३१॥

मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न । 
मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥

ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता । 
यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची ॥३३॥

कृष्ण म्हणे ’ समं हि ब्रम्ह ’ । समता हाचि ईश्वरी धर्म । 
समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म समत्वचि ॥३४॥

सर्वठायीं वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव । 
दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजीं ॥३५॥

सर्व धर्म सोडोनिया । शरण जावें एका देवराया । 
सर्वव्यापक जाणोनि तया । हेंचि वर्म उध्दाराचें ॥३६॥

सर्वांविषयीं समभाव । सर्वांभूती वासुदेव । 
हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा ॥३७॥

या दृष्टीने करी जें जें कांही । ती सर्वेश्वराची पूजाच होई । 
जेथे आप-पर भेद नाही । समन्वयीं चित्त आलें ॥३८॥

मग तो असो कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा । 
तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानूं आम्ही ॥३९॥

यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सर्व धर्मी समत्व कथिलें । 
परि याचे फायदे घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥

कोणीं युध्द करोनि लोकां जिंकिलें । बळेंचि आपुल्या धर्मी ओढिलें । 
कोणीं प्रलोभनांनी मोहविलें । वाटे का हें योग्य तुम्हां ? ॥४१॥

कांही दूरदेशींचें लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती । 
भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥

वाढवोनि आपुलें संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ । 
ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेंतूनि ॥४३॥

सर्व धर्मीं समभाव । म्हणतां धर्मान्तरासि मिळे वाव । 
येणें बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि कांही ॥४४॥

यावरि ऐकावें उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर । 
ह्या गोष्टींत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे ॥४५॥

धर्मान्तराचा करितां विचार । ज्ञात्याचेंचि योग्य धर्मान्तर । 
परि ज्यासि कळलें सारासार । त्यासि धर्मान्तर कशासाठी ? ॥४६॥

ज्यासि कळलें धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचें नुरे महत्त्व । 
मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे तें तें ॥४७॥

न करील कोणावरि आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन । 
लोभें भयें परधर्मग्रहण । हें अध:पतन वाटे तया ॥४८॥

दुसर्‍या धर्मासि युध्दें छळिलें । त्यासि धर्मसेवा नाम दिलें । 
हें महापातक असे बोलिलें । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥

तैसाचि जो समान अज्ञानी । त्यासि विधर्मी नेलें मोहवूनि । 
त्यायोगेंहि उन्नति कोठूनि ? तें तों सोंग बहुरूप्याचें ॥५०॥

मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला । कांही गरजांमुळे वश झाला । 
तरी त्याचा फायदा असला । घेऊं नये दुसर्‍यांनी ॥५१॥

कोणींहि सेवा करायासि यावें । परि धर्मान्तर मोहाने करवावें । 
आपले जनगण वाढवावे । हें तों दुष्ट राजकारण ॥५२॥

धर्मवर्में एकचि असती । परि हे राजकारण त्यांत गोविती । 
संख्याबल वाढवोनि करिती । परस्परांचा वैरभाव ॥५३॥

धर्मप्रचाराचे नांवाखाली । राज्यसाधना आंतूनि घाली । 
त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि ॥५४॥

तो नव्हे कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेंचि धर्म त्याचा । 
अव्हेरूनि द्यावा जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥

तैसाचि न ओळखतां स्वत्व । दुसर्‍यांचें मानोनि महत्त्व । 
उगीच परधर्मीं घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे ॥५६॥

समजोनि तत्त्व सर्वांत मिळावें । परि पोटाकरितां धर्मा न सोडावें । 
आत्ममार्ग न समजतांचि करावें । कासयासि हें सारें ? ॥५७॥

ऐसें जेथे जेथे झालें । त्यांना कलंकचि लागले । 
पाहतांना आजहि दिसलें । अनुभवियासि ॥५८॥

येथे आपणहि आहों कारण । याचें असूं द्यावें स्मरण । 
खर्‍या धर्माचें सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन जनां ? ॥५९॥

लोक धर्म-धर्म ओरडती । प्रसंग पडल्या कामीं न येती । 
संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचें ॥६०॥

धर्माचा बाळगती अभिमान । परि धर्मबांधवां नाही स्थान । 
कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तयां धर्मलंड ॥६१॥

मानवाचा स्पर्शहि पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप । 
विधर्मी जातां मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥

दीनदलितांची तहानभूक । दीनदलितांचें सुखदु:ख । 
कांहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक चालविती ॥६३॥

सर्वांठायीं म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखें करिती कर्म । 
ऐसें नाही धर्माचें वर्म । बोलिलें संतीं कोठेहि ॥६४॥

परि हे शिकवाया उपदेशक कुठले ? कोण लोकांस समजावी भलें ? 
हे तों सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावें ॥६५॥

पोटपुजार्‍यांनी केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार । 
मानवांमाजीं पाडलें अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥

हें सर्व आडाणपण । जोंवरि जाणार नाही मानवांतून । 
तोंवरि जगाची उन्नति पूर्ण । होणें कठिण समजावें ॥६७॥

त्यासाठी एकचि करावें । आपापलें धर्मक्षेत्र सुधारावें । 
सकळांसीच सकळांचें द्यावें । तत्त्वज्ञान समजावोनि ॥६८॥

हें ज्या धर्मास जातीस फावे । तेणेंचि सुखसोहळे बघावे । 
यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी ॥६९॥

कांहींनी करावा आदिवासी-सुधार । जावोनि रानीं खेडयांवर । 
पाहावें गरीब लोकांचें कुटीर । कैसें आहे ॥७०॥

गरीब जंगली आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती । 
झाडाखालीच असते वसती । कित्येकांची ॥७१॥

त्यांसि बोलणें चालणें समजेना । भिवोन पळती बघतांचि आपणा । 
प्रेम लावोनि त्या कुटुंबांना । करावें आपण आपलेंसें ॥७२॥

त्यांना औषधपाणी पुरवावें । लिहिणें वाचणेंहि शिकवावें । 
उत्सवीं सहभोजनीं मिसळावें । कार्यकर्त्यांनी ॥७३॥

जनीं भोजनीं मंदिरीं । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी । 
स्थान-मान सर्वतोपरीं । एक करावें सर्वांचें ॥७४॥

स्वच्छ राहणी निर्व्यसनी । शिकवावी स्वयें त्यांत मिसळोनि । 
तुच्छ न मानावें दुरोनि । उणीव दावोनि परभारें ॥७५॥

दूर कराव्या अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी । 
सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्नें ॥७६॥

आजवरि यांची केली उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा । 
घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि सदभावें ॥७७॥

जे कोणी असती अडले-नडले । रंजले-गांजले रोगें पिडले । 
त्यांसाठी पाहिजे धाम निर्मिलें । सुखशांतीचें, आरोग्याचें ॥७८॥

क्षय अथवा कुष्टरोग । हे न मानितां दैवाचे भोग । 
त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे गांवोगांवीं ॥७९॥

भंगलेल्या मानवी मूर्ति । यांच्या सेवेंतचि ईश्वरभक्ति । 
आर्तासि दिल्यावांचूनि शांति । मागतां मुक्ति मिळे कैसी ? ॥८०॥

जीवनांतूनि जे जे उठले । त्यांशी सहृदयपणें पाहिजे भेटलें । 
अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा ॥८१॥

अंध पंगु मूक बधीर । अशक्त अपंग निराधार । 
या ईश्वरी चित्रां रंगविती सुंदर । ते ते थोर धर्मशील ॥८२॥

विधर्मी लोक हें कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति । 
किळस आळस आमुच्या चित्तीं । अधोगति आमुची ही ॥८३॥

सोडोनिया ऐसा स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव । 
दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म ॥८४॥

हाचि धर्म संतीं आचरिला । जनीं जनार्दन ओळखिला । 
निर्लोभ प्रेमें सजविला । विश्वबगीचा ॥८५॥

धर्मावतार रामकृष्ण । जटेने झाडी अस्पृश्यांचें अंगण । 
एकनाथ केलें भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचें ॥८६॥

चैतन्य महाप्रभूने हृदयीं । आलिंगिले दलित, रोगीहि । 
गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि ॥८७॥

विधवा अनाथ-अपंगसेवा । पैगंबरें मानिला पुण्यठेवा । 
जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥

श्रीरामें शबरीचीं खादलीं बोरें । गुहका आलिंगिलें प्रेमभरें । 
मित्र केलीं आदिवासी वानरें । अहिल्येसि उध्दरिलें ॥८९॥

श्रीकृष्ण गोवळयांत नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला । 
जोबवतीशीं विवाह केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥

भीष्माचिया वडिलाने । वरिलें कोळियाच्या कन्ये । 
ऐसीं शेकडो प्रमाणें । सापडती पूर्व ग्रंथीं ॥९१॥

सीता शकुंतला कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र । 
समाजें सांभाळितां झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन ॥९२॥

ज्ञानदेव नामदेवादि संतीं । आलिंगिलें दलित समाजाप्रति । 
किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यांत त्याकाळीं ॥९३॥

संत चोखोबाचें सारें घर । झालें भक्तीचें मंदिर । 
उपेक्षिल्या समाजीं देवत्व थोर । देतां संस्कार प्रगटे तें ॥९४॥

सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार । 
कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे ॥९५॥

तैसेचि आजहि उदया येती । घरोघरीं नामांकित पुरुष-युवती । 
त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या समाजांची ॥९६॥

महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हें ओळखलें । 
दलितोन्नतीचें कार्य केलें । कर्तव्य आपुलें तेंचि असे ॥९७॥

मानवें मानवा समान समजणें । परस्परां उन्नत करणें । 
संसारासि या आनंदें भरणें । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥

कोणी कोणास त्रासवूं नये । कोणी कोणास फसवूं नये । 
कोणी कोणास दुरावूं नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥

पाहाव्या त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी । 
भेदभावना समूळ जाई । जीवन ऐसें निर्मावें ॥१००॥

मग त्यांचा विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे । 
वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचें ॥१०१॥

हेचि आहे धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा । 
मागासल्या सर्वचि बांधवां । बंधु समजोनि शिकवावें ॥१०२॥

पडित रान हें उठवावें । फुलाफळांनी बहरूं द्यावें । 
आहारीं जाऊंच न द्यावें । कोणाचिया कोणा ॥१०३॥

परि अन्य धर्मांशीं वितंडावें । कोणी कोणाचे दोष मांडावे । 
हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवूं नयेत सेवकांनी ॥१०४॥

आपुला पिता जरी वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य । 
हेंचि धर्माचें सूत्र आद्य । सर्व धर्मी समभावनेचें ॥१०५॥

ही दृष्टि सर्वांसीच द्यावी । समाजीं मानवता वाढवावी । 
म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गांवीं । उरणार नाही ॥१०६॥

साधनांमाजीं उत्तम साधन । संस्कारें तयार करावें मन । 
सेवामार्गे मनीं घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥

कलापथक प्रवचन कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण । 
नाटकादि प्रत्येक साधन । याच कार्यीं योजावें ॥१०८॥

जें जें ज्यासि असेल ठावें । तें तें समाजा शिकवीत जावें । 
जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥

खरा धर्म जाणतील लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक । 
मग न गडेल परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥

यासाठी भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचें साधन । 
प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावें संपूर्ण त्यांतूनि ॥१११॥

आपुल्या गांवचा कोणीं प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी । 
हीच खरी गांवाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो ! ॥११२॥

हेलावतां सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार । 
मग कोठे धर्म धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वां ॥११३॥

भ्रामक रूढयांच्या कल्पनांतून । वर येऊं द्या धर्मनिधान । 
त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया म्हणे ॥११४॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय संपूर्ण ॥११५॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥