वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तेविसावा

ग्रामगीता

अध्याय तेविसावा : सणोत्सव

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । 
तो आमुच्याहि मनीं वाटला । उत्तम ऐसा ॥१॥

परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवें । 
तेणें ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वांसि ॥२॥

तयांसि आपण गौण ठरविलें । याचें कारण पाहिजे बोलिलें । 
तरि आता उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥३॥

आजचे करूं जातां सणवार । दिवस न पुरती वर्षभर । 
त्यांत जयंत्या-पुण्यतिथ्या येती फार । वाढदिवस निराळे ॥४॥

हे सर्वचि पाहिजेत केले । तरि कामधंदे सर्व गेले । 
एवढेंच करोनि सर्व भागलें । होईल कैसें ? ॥५॥

म्हणोनि त्यांत सानथोर निवडावे । तारतम्याने करीत जावे । 
प्रसंगमान पाहोनि वर्तावें । सर्वकाळ ॥६॥

जें जें करावें तें समजोन । सांगतां यावें त्याचें कारण । 
उगीच लाडूपेढे खाया जयंतिदिन । पाळूं नये ॥७॥

पूर्वजांनी जो हेतु योजिला । तो पाहिजे समजोनि घेतला । 
त्याचि उद्देशाप्रमाणे झाला । पाहिजे सणवार ॥८॥

भारतवर्षाची चालीरीति । अत्यंत योजनाबध्द होती । 
त्याने सहज चाले सुस्थिति । समाजाची ॥९॥

तेंचि पुन्हा उजळावें । म्हणोनि बोलिलों सहजभावें । 
तत्त्वता उत्सवासि गौणत्व द्यावें । ऐसें नाही ॥१०॥

उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव । सणवारमुहूर्ताचा त्यासि गौरव । 
विशेष कार्यासाठी धाव । नेहमी त्याची ॥११॥

विशेष कांही कार्य व्हावें । ऐसें घेतलें त्याच्या जीवें । 
न घे आढेवेढे, मनोभावें । खर्च करी मनमाने ॥१२॥

ऐसें उत्सवाचें नांव घेवोनि । धन व्यर्थ उधळूं नये कोणी । 
तें लागावें सत्कारणीं । बोलिलों म्हणोनि बचत करा ॥१३॥

नाहीतरि घरीं दिवाळी केली । दिवाळें निघावयाची सोय झाली । 
जनता हसेल गांवांतली । ’ हौसी नटराज ’ म्हणोनि ॥१४॥

तैसी होऊं न द्यावी फजीती । बसावें तरि सर्वांचे पंगतीं । 
परि होऊं न द्यावी जीवनाची माती । कधीहि आपुत्या ॥१५॥

एके दिवशीं सण केला । तें भोगणें आलें दुसर्‍या दिवसाला । 
ऐसा कोणीच नाही सांगितला । गृहस्थ-धर्म ॥१६॥

पुढेहि आहेत सणवार । समजोनि करावा विचार । 
प्रसंग येती पुढे थोर । त्यासहि देणें सहकार्य ॥१७॥

कांही प्रसंगमानासाठी । पैसा ठेविला पाहिजे गांठीं । 
सण येतांचि उठाउठी । खर्चूं नये सर्व शक्ति ॥१८॥

कोणीहि करितां सणोत्सव । पाहावी आपुली आधी उणीव । 
मग पुढे टाकावा पाय रेखीव । हर्षासाठी ॥१९॥

चार जणांसि मिळवावें । आनंदीआनंद करीत राहावें । 
त्यांतूनि नेहमीचे धडे घ्यावे । वागण्यासाठी ॥२०॥

वाढवितां यावें जीवनज्ञान । कधीहि न वाढावेत दुर्गुण । 
मग करावें निर्भय मन । प्रसंगासाठी ॥२१॥

कांही सण घरीं करावे । कांही सार्वजनिक जागीं ठरवावे । 
सर्व मिळोनि उचलीत जावे । ओझे कांही ॥२२॥

उत्सवाच्या निमित्ताने । सुंदर करावीं सहभोजनें । 
बंधुप्रेम वाढेल जेणें । आचरावें तैसेंचि ॥२३॥

घरोघरच्या शिदोर्‍या आणून । अथवा स्वयंपाक सर्वांमिळून । 
तेणें प्रेमानंद ये उचंबळून । एकत्र खातां ॥२४॥

असला नसला प्रसादचि द्यावा । प्रसंग गोड करोनि घ्यावा । 
परि खाण्यांतचि वेळ न जावा । समाजाचा ॥२५॥

सुंदर करावें कथाकीर्तन । दिंडया खेळ मनोरंजन । 
परि लागावी उत्तम चालचलन । समाजासि ॥२६॥

खरा उत्सव रोजचें कर्म । विचारें सांभाळावा धर्म । 
परि नैमित्तिक सणांचेंहि वर्म । जाणोनिया आचरावें ॥२७॥

दत्तजयंति रामनवमी । हनुमानजयंति गोकुळाष्टमी । 
शिवरात्रि आषाढी ऋषिपंचमी । विविध कार्यांनी पाळावी ॥२८॥

वटसावित्री शारदोत्सव । रक्षाबंधन संक्रांतिपर्व । 
गौरीपूजनादि महिलांचे उत्सव । सामुदायिक करावे ॥२९॥

उद्योगदिन स्नेहसंमेलन । बलोत्कर्ष आणि प्रार्थनादिन । 
गीताजयंतीस बुध्दिविकासदिन । पंचमहोत्सव आवश्यक ॥३०॥

सर्व जाती-जमाती मिळून । हळदकुंकू तिळगूळ सुवर्णदान । 
चढाओढी ग्रामशुध्दि रामधून । भाषणें आदि करावीं ॥३१॥

तैसाचि आला पोळा सण । हाहि आहे महत्त्वपूर्ण । 
यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन । शेती-सामानासहित ॥३२॥

उत्तम रांगेंत बैल ठेवावा । साजेल तैसा अंगीं भूषवावा । 
त्यांत ज्याची सफल सेवा । त्याचा गौरव त्या दिवशीं ॥३३॥

कोणीं जोडी उत्तम ठेवली । कोण बैलास खुराग घाली । 
इनामें द्यावीं त्यांस भलीं । सर्व गांवकर्‍यांनी ॥३४॥

कोणाचें उत्तम शेतीसाधन । कोणीं ठेवले नोकर प्रसन्न । 
त्याचें वाढवावें उच्च स्थान । पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥

घरोघरीं जोडी फिरवावी । मिरवीत मिरवीत घरीं न्यावी । 
इनामपोळी माणसांनी घ्यावी । प्रसन्न ठेवावी वृत्ति त्यांची ॥३६॥

कांही पाडवां जुगार खेळती । ही आहे समाजाची अधोगती । 
कांही लोक जिंकोनि जाती । कांही हरती वस्त्रेंहि ॥३७॥

ऐसी रीति बंद करावी । हवीं तर दंगलेंहि भरवावीं । 
कामगारासि इनामें द्यावीं । काटक चपल म्हणोनिया ॥३८॥

ऐसाचि आहे दशहरादिन । विजयादशमी उत्साहपूर्ण । 
त्याने वाढे स्नेहसंघटन । उत्तम गांवीं ॥३९॥

सगळयांनी मिळोनि मिरवीत जावें । थोर पुरुषांचे गोडवे गावे । 
पूर्वऋषींचें कौतुक करावें । गौरवावें राष्ट्रासि ॥४०॥

ते दिनीं उत्तम संकल्प करावा । ’ आपुलें तें सर्वांचें ’ हा बोध घ्यावा । 
मतभेद समूळचि विसरावा । सोनें देवोनि एकमेकां ॥४१॥

पुढे वितंडणेंचि नसावें । सकळांनी सकळांसि वंदावें । 
परस्परांचे आशीश घ्यावे । बंधु-बंधु म्हणोनि ॥४२॥

मिरवीत मिरवीत यावें घरीं । संतदेवासि वंदोनि अंतरीं । 
वाडवडिलांचे वरदहस्त शिरीं । धारण करावे कौतुकाने ॥४३॥

नवीन कार्यसंकल्प करावा । मग वर्षभरि तो टिकवावा । 
ऐसा सोहळा सगळयांनी साधावा । एकात्मतेने ॥४४॥

दिवाळीचा सण आला । सर्वांनीच पाहिजे केला । 
परि पाहावा कोण राहिला । भुकेला घरीं ॥४५॥

त्यास आमंत्रित करावें । गोडधड भोजन द्यावें । 
परस्परांनी मिळून चालवावें । वैभव सर्वांचें ॥४६॥

गांवचें एकचि असावें लक्ष्मीपूजन । प्रचंड मंडपीं करोनि स्थान । 
सर्वांस द्यावें फराळ भोजन । सर्वांमिळोनि ॥४७॥

आनंद उसळावा घरोघरीं । सुखी गायीवासरें नरनारी । 
भाऊबहिणीचें परोपरीं । नातें वाढे ऐसें व्हावें ॥४८॥

बंधुभाव भगिनीपण । हें नातें ओसरलें समाजांतून । 
तें वाढाया नव्या पीढींत पूर्ण । योजना भाऊबीजेची ॥४९॥

तैसेंचि भरवावें गोप्रदर्शन । कोणत्या गायी दुधाळ पूर्ण । 
कोणता वळू गुणसंपन्न । उंचपुरा पहावा ॥५०॥

तो सगळयांनी गौरवावा । सर्वांमिळोनि इनाम द्यावा । 
गायीगुरांचा महिमा पटवावा । सर्व जना ॥५१॥

आपापली गाय प्रभावी । पुढे करावयासि सांगावी । 
पुढची गुढी उभारावी । इनाम देऊं म्हणोनि ॥५२॥

तैसेंचि वाढवावें खताचें महिमान । नर्कासुरास निमित्त करून । 
शेणखतादिकांचें वर्णन । विशद करून सांगावें ॥५३॥

याच खतामुताच्या संयोगें । शेती उत्तम राहोनि पिके । 
म्हणोनि सर्वांनी योग्य खळगे । करोनि खत सांभाळावें ॥५४॥

शेतीमाजीच शेणदि जावें । तरीच भूमिमाता पावे । 
हें घरोघरीं सांगावें । हाचि खरा दिवाळसण ॥५५॥

गांवीं ज्याने लक्ष्मी नांदे । लोक जगतील आनंदें । 
ऐशा प्रयत्नांनीच साधे । खरी दिवाळी ॥५६॥

बारा महिन्यानी दिवाळी आली । घरेंदारें स्वच्छ झालीं । 
भिंत-ओसरी सारवोनि ठेविली । रंगरंगोटी लावोनि ॥५७॥

दुसरे दिवशीं सडा नाही । झाडझूड तीहि नाही । 
घाण पसरली सर्वहि । जिकडे तिकडे ॥५८॥

ऐसी करितां दसरादिवाळी । अवदशाचि येई कपाळीं । 
त्यापेक्षा रोज सकाळीं । उठणें हाचि दिवाळसण ॥५९॥

सण म्हणोनि करावें अभ्यंगस्नान । नाहीतरि फासावें वंगण । 
हें कोठचें शहाणपण । शिकलों आम्ही ? ॥६०॥

रोजचि थोडें करीत जावें । स्नानध्यान पाठादि बरवें । 
श्रम करोनि सौंदर्य वाढवावें । घरींदारीं ॥६१॥

दिवाळींचें निमित्त करोनि । स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी । 
उकिरडाहि नीट करोनि । दिवा लावावा स्वच्छतेचा ॥६२॥

नेहमी स्वच्छ ठेवावें घर । श्रम करावेत अंगभर । 
हाचि खरा सणवार । नित्य सुंदर वर्तणूक ॥६३॥

जो नेहमीच स्वच्छता करी । त्याने उत्सव पाळले सर्वतोपरीं । 
उत्तम जेवावी भाजीभाकरी । देवादिकां अर्पोनि ॥६४॥

ऐसें व्रत जो सांभाळी । त्याची खरी दसरादिवाळी । 
नाहीतरि समजा होळी । आपुल्या सार्‍या जीवनाची ॥६५॥

होळीचा आला शिमगासण । त्यांत मोठी मारहाण । 
लोक इभ्रतमान सोडोन । पळती मार्गी वेडेसे ॥६६॥

हा वाढला विचित्रपणा । ऐसा नोहे शिमगा जाणा । 
त्यांतहि आहे तात्विकपणा । घेण्यासारिखा समाजा ॥६७॥

याच दिवशीं प्रल्हादाची छळणा । केली होती होळीने जाणा । 
परि दु:ख न झालें प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि ॥६८॥

शेवटीं छळणारेचि जळले । हें गांवासि कौतुक झालें । 
म्हणोनि जन ओरडले । उपहास त्यांच करोनि ॥६९॥

त्याच दिवशीं शंकराने । काम जाळिला तिसर्‍या नयनें । 
म्हणोनि कामास धिक्कारिलें भूतसेनेने । हलकल्लोळ करोनि ॥७०॥

त्याच दिवशीं सज्जनांनी । वार्षिक यज्ञाची केली आखणी । 
संपूर्ण गांव साफ करोनि । द्यावें पेटवोनि कैचण तें ॥७१॥

त्याच्या प्रकाशीं सर्वांनी जमावें । आपलें दुष्कृत्य निवेदावें । 
पुढे तैसें न करण्याचें योजावें । अनुतापाने ॥७२॥

हें मनोधैर्य कमी पडलें । म्हणोनि दुसरे जन ओरडले । 
गांवाचें पाप धुवोनि काढले । ऐसियापरीं ॥७३॥

पुढे याचा विपर्यास झाला । शिवीगाळ देती परस्पराला । 
पोथ्याहि सांगती ’ अभद्र बोला ’ । मूळ त्याचें न जाणतां ॥७४॥

म्हणती कोणी वर्षातून । शिव्यासाठीच एक दिन । 
परि सज्जनासि याचें काय कारण ? ये उत्तेजन दुर्जना ॥७५॥

या सणीं मुख्य धूलिवंदन । जें ग्रामसफाईचें प्राचीन चिन्ह । 
अस्पृश्यांनाहि स्पर्शावें म्हणून । सांगितलें ग्रंथीं त्या दिवशीं ॥७६॥

आधी सार्वजनिक अग्निपूजन । त्यांत वाईट वृत्तींचें दहन । 
मग राख न्यावी उकिरडीं पूर्ण । करावें स्नान समुदायें ॥७७॥

ऐसा ग्रामसेवेचा आनंद । त्याने परस्परां लाविला सुगंध । 
प्रसन्नता दाखवाया विशद । योजिला प्रसंग रंजनाचा ॥७८॥

ठिकठिकाणीं गाणें वाजवणें । रंगगुलाल आदि उधळणें । 
प्रसन्न ठेवावया मानवी मनें । शिमगा सण योजिला ॥७९॥

राजेरजवाडयांचिया दरबारीं । त्यास रूप आलें शृंगारी । 
श्रीकृष्णाचिया नांवें रंगपिचकारी । उघविण्याचें ॥८०॥

गांवीं वेगळाचि विपर्यास झाला । ग्रामशुध्दीचा उद्देश गेला । 
नालीमोरींचा उडवोनि मैला । दु:ख देती जनतेसि ॥८१॥

कुणाचीं लाकडें चोरूनि नेती । घरच्या वस्तूहि होळींत टाकती । 
गाडी घोडयांचें सामान जाळती । खाट नेती स्मशानीं ॥८२॥

या सणाने होतें सणसण । गांव दिसूं लागतें भणभण । 
ऐसा हा प्रसंग वाईट म्हणोन । करिती टिका धीर प्राणी ॥८३॥

परि यासि वळण लावावें । ऐसें वेडेपण होऊं न द्यावें । 
त्यांत सौंदर्य पावित्र्य भरावें । गाणें वाजवणें ठेवोनि ॥८४॥

होळी निमित्तें जमवोनि नरनारी । घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरि । 
ग्रामसुधारक नाटिका बरी । मनोरंजनासि योजावी ॥८५॥

होळी म्हणजे ग्रामशुध्दिजन । तैसेचि मातृदिन बालकदिन । 
श्रमिकदिन मानवतादिन । स्वातंत्र्यदिनादि कितीतरी ॥८६॥

तैसेचि अनेक लहान सण । सर्वांत असावें तत्त्वानुसंधान । 
उदरपूर्तीचें दिखाऊ साधन । ऐसें झालें तरि व्यर्थ ॥८७॥

प्रगतीसाठी सणवार करावे । कांही सण एके ठायींच घडवावे । 
सर्वांमिळोनि आचरावें । सहकार्याने ॥८८॥

पूर्वी घरोघरीं गणेशोत्सव । नाना रूढयांचे उपद्रव । 
लोकमान्यांनी आणिलें महत्त्व । राष्ट्रीय रूपें तयासि ॥८९॥

गांवाचा एकचि गणपति । सर्वांसाठी कार्यक्रम होती । 
जेणें वाढेल राष्ट्रीय वृत्ति ऐसी असावी धारणा ॥९०॥

तोचि उत्तम सण, उत्सव , दिन । जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण । 
हेंचि घडावया महाकारण । संतीं बोधिलें समाजा ॥९१॥

जनता असते उत्सवप्रिय । म्हणोनि त्या मार्गेचि लावावी सोय । 
राष्ट्रीय भावना जागे निर्भय । तोचि करावा उत्सव ॥९२॥

विशेष निमित्तें संघटित व्हावें । सर्वांमिळोनि कार्य करावें । 
जेणें बोझ न पडावा जीवें । कोणावरि ॥९३॥

नाहीतरि आपुलें मनोरंजन । त्यासाठी जावे दुसर्‍यांचे प्राण । 
ऐसें करील जो उत्सव सण । तो तो हीन या लोकीं ॥९४॥

परका सुखी आपणहि सुखी । तत्पर परस्परांचे कौतुकीं । 
वागणूक सर्वांची सारखी । सर्वांसाठी असावी ॥९५॥

ही मानव्यबुध्दि उपजावया । गांवोगांवीं बदलावी उत्सवप्रक्रिया । 
जेणें धडा मिळे लोकांसि या । नेहमी वागणुकीसाठी ॥९६॥

सकल धर्मामाजी सणवार । याचिसाठी केले सानथोर । 
जेणें मनुष्याची कदर । मनुष्य करील सर्वदा ॥९७॥

सामुदायिकता वाढे सर्वत्र । हेंचि सणवारांचें मूळसूत्र । 
सामुदायिकपणाचा प्रकार । तोंचि खरा उत्सव ॥९८॥

ज्या दिवशीं गांव झालें एक । तोचि उत्सवदिन अलौकिक । 
ओळखूं न येती रावरंक । उत्सवामाजी ॥९९॥

ज्यासि नाही त्यासि देणें । जो बिघडला त्या सरळ करणें । 
आप्त समजोनि उचलोनि घेणें । पडला त्या सर्वतोपरीं ॥१००॥

हेंचिं खरें औदर्य आहे । गांवाच्या सुखांत उत्सव पाहे । 
तेणें सदाचा सणवार राहे । आपुल्या गांवीं ॥१०१॥

पूर्वी गांवीं बारा बलुते । अठरापगड जातीचे जत्थे । 
परस्परांवरि अवलंबून होतें । सहकारी जीवन ॥१०२॥

कोळी जाळें घेवोनि येई । सोनार जिवती लावोनि देई । 
न्हावी धोबी गोवळी नेई । धान्यादिक सणावारीं ॥१०३॥

परि तो आता नुरला कायदा । उत्सवास येणें हा नव्हे फायदा । 
सणवार सांगणें हा नव्हे धंदा । कोणाच्याहि पोटाचा ॥१०४॥

ही आहे निर्मळ सेवा । उजळावया अंतरींचा दिवा । 
पोट भरण्याचा प्रश्न उत्सवां । आणोंचि नये ॥१०५॥

सकळांनी कामधाम करावें । उरल्यावेळीं सणवार सांगावे । 
मंडपादि करण्यास लागावें । सेवाभावें सर्वांनी ॥१०६॥

ऐसें सांगणें हें निराळें । परि त्या निमित्ताने भुलवावे भोळे । 
तेणें घोटाळोनि लोक सगळे । नास्तिक जैसे बोलती ॥१०७॥

श्रम-विभागणी होती पूर्वी । त्यांतूनि ही वाढली स्वार्थचवी । 
त्याच कामीं लागले भिक्षुकगोसावी । नांव बुडवाया पूर्वजांचें ॥१०८॥

जो कोणी एवढेंचि करी । त्यासि गांवाने द्यावी चाकरी । 
उदर भरण्याची व्यवस्था पुरी । परिश्रमाने सर्वकाळ ॥१०९॥

बेकारी न ठेवावी ग्रामाप्रति । उधळपट्टी न करावी कोणेरीतीं । 
उत्सवाने उत्तम गति । लागे तैसेंचि करावें ॥११०॥

उत्तमगति तोचि उत्सव । एरव्ही मोलें घेतले उपद्रव । 
तैसें न व्हाया करावें गांव । संघटित आणि क्रियाशील ॥१११॥

साधावा कार्याचा उसाह । तोचि उत्सव नि:संदेह । 
तुकडया म्हणे गांवीं प्रवाह । वाहूं द्या शांतिसुखाचा ॥११२॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुणशास्त्र-स्वानुभव-संमत । 
कथिला सणोत्सवांचा मुख्यार्थ । तेविसावा अध्याय संपूर्ण ॥११३॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥