वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अग्नि भडकला युद्धाचा

(छंद : चाल : हरिका नाम सुमर नर प्यारे...)
 
अग्नि भडकला युध्दाचा,
अन्‌ तू आळशि होऊन बसे ।
तरुण असोनी रक्त न उसळे,
नौजवान तुज म्हणा कसे ? ॥धृ.
 
लाव छातिला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हाया ।
देशासाठी, धर्मासाठी, अर्पण कर अपुली काया 
मेला तर तू शहीद होशिल, कीर्ति तुझी देशावरती ।
जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतिल राष्ट्रपती 
सिंहासम ही छाती तुझी, अन्‌ पोलादासम हात तुझे ।
बिजलीसम ललकार तुझीही, तोफ, बाँब करि हात तुझे 
या भारत देशाचे तुजवर, कर्ज असे, ऋषिऋण असे ।
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणा कसे ॥१
 
मागे का पाहतोस पुढे चल, शत्रूवरती मात करी ।
न्यायाची भूमिका तुझी तर, काळाची का भीति धरी ? 
एक दिवसही फुका न घाली, संकटवेळा घरि आली ।
संकटावरी मात करी तू, हो शत्रूचा काळ बली 
तत्वासाठी जगा, लढा अन्‌ लावा अपुला प्राणपणा ।
देह जाइ पण देश न जावो, नरवीरांचा हा बाणा 
तुकड्यादास म्हणे भारत हा, शूरवीरांचा देश असे ।
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणा कसे ॥२