वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अगं वृत्ति ! कुठे तू जाते ?

(चाल : उध्दवा ! शांतवन कर जा...)
 
अगं वृत्ति ! कुठे तू जाते ?
तव प्रेम कुणाशी जडले ? ॥धृ.॥
 
सोडशील का गे मजला ?
मम हृदय अधिर गडबडले ।
सुखरूप-स्थला सोडुनिया, तव प्रेम कसे गे उडले ?
(अंतरा) चल फिर अता माघारा ।
सोड हा बहिर्मुख चारा ।
का घेसि विषय-सुख-वारा ?
का अनल नेत्र हे चढले? तव प्रेम कुणाशी जडले ? ॥१॥
 
तुज आठवते का माझी,
मित्रता कितिक दिवसाची ?
विसरलीस का गे अपुल्या, त्या याद निज स्वरुपाची ?
अस्मिती ब्रह्मः- भानूच्या,
तू लाट तेजपुंजाची ।
(अंतरा) असुनिया अशी का वेडी ?
धरितेस विषय-भ्रम-बेडी।
तुज कुणी दाविली गोडी ?
विपरीत असे का घडले ? तव प्रेम कुणाशी जडले ॥२
 
स्वानंदपरीमल घ्याया, 
तुज स्वाद नसे का आला ?
साम्राज्य ब्रह्म-भुवनाचा, स्वातंत्र्ययणा ना रुचला ?
की वरताना सर्वज्ञा,
तव प्रेम अचानक विरला ?
(अंतरा) कोणते दु:ख तुज होते ?
म्हणउनिया जाऊ पहाते ।
व्यभिचारपणा अनुसरिते ।
तुज हवे काय ते नडले? तव प्रेम कुणाशी जडले ? ॥३
 
अग ! सोडशील मम आशा,
लागेल सवेच दुराशा 
चौऱ्यांशि लक्ष योनींच्या, जाशील बांधुनी पाशा ।
वबळवील कोण मग तुजला ?
भोगशील गर्भ-इराशा ।
(अंतरा) हो ऊर्ध्व अंतरामाजी ।
बघ नको करु इतराजी ।
तुकड्याचि आस ही गर्जी ।
सांगता चित्त धडपडले, तव प्रेम कुणाशी जडले ? ॥४