वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अध्याय सहावा

आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)

अध्याय सहावा
(कर्म, अवस्था, कोशांचा साक्षी)

॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥

बा रें तूं कर्म की कर्मांचा कर्ता ? । लटकीच धरोनिया वार्ता ।
घेसी देहाभिमाने माथा । हांचि अभाव जाणावा ॥१॥

कार्य-कारण भूती ओळगे । अविद्या तों धावें मागे ।
तें तूं घेसी वाउगे । अंगी लावोन सर्वथा ॥२॥

कारण जडबुद्धी उठवी । भूतें करिती कार्ये बरवी ।
आवरण घेऊनि तूं गोसावी । म्हणसी माझें सर्व हें ॥३॥

हां तों चिदाभासाचा खेळ । जैंसे सूर्य योगे मृगजळ ।
वाटते परि मिथ्या सकळ । तूं तों ऐंसा नव्हेसी ॥४॥

कार्य-कारण-कर्तेपण । हें तों अविद्यात्मक जाण ।
अससी अलिप्त तूं पूर्ण । अपूर्ण नव्हे सर्वथा ॥५॥

पूर्णरूपी अपूर्णाची मात । कैसी शोभेल समस्त ? ।
पूर्ण तें अपूर्ण न होत । ऐंसा वाद श्रुतीचा ॥६॥

कर्म-प्रारब्धाची गणना । नसे तंव स्वरूपी जाणा ।
मूळ स्फुरणाच्याहि पार प्रमाणा । रूप तुझें जाण पां  ॥७॥

कर्मस्फूर्ति कोठोनि झाली ? । अंत:करणे उभारिली ।
तयाच्याही पार राहिली । सीमा तुझ्या स्वरूपाची ॥८॥

प्रथम पुरुष-प्रकृती जाण । तयांपासूनि त्रिगुण ।
तूज तयांचे जाणतेपण । दृश्य नव्हसी सर्वथा ॥९॥

तूज न साजे दृश्यपण । तूं तों अदृश्य द्रष्टा जाण ।
जाणावया साक्षी पूर्ण । जाणपण भिन्न न लागे ॥१०॥

अविद्याभास लटके भान । हें तों तुझेंचि आवरण ।
तया ढोंगी गटात जावोन । फससी केवी बापा रें ! ॥११॥

अवस्था ज्या चार भूती । जागृती स्वप्न ती सुषृप्ती ।
चौथी तुर्या असे जाणती । तुझिया रूपी आवरणे ॥१२॥

प्रथम जागृती लटके भान । मायारूपी मृगजळ पूर्ण ।
ते तो जाण अज्ञान । तू तो नित्य सर्वज्ञ ॥१३॥

स्वप्नावस्था जव प्रगटे । जागृतीचे भान आटे ।
तव तू साक्षित्वरूपे गोमटे । जाणसी स्वप्नखेळासी ॥१४॥

लाधलिया सुषुप्ती पूर्ण । नवचे स्वप्नाचेही भान ।
तई तू साक्षिरूपे जाण । अभावा पाहसी आत्मत्वे ॥१५॥

सुषुप्ती गेलिया प्रगटे तुर्या । तिन्ही अवस्थांते जाणे रया ।
सुर्येचा तो द्वैती पय्या । तयाचाही तू साक्षी ॥१६॥

पाहसी चारी अवस्थाला । तव तू अवस्था कैसा झाला ? ।
दृश्य म्हणवोनि आपुल्याला । द्रष्टेपणा सोडिया ॥१७॥

जरी म्हणशी पंचकोष । मजसवे राहती रात्रंदिस ।
तरी तयांचाही भास । कळवू आदरे सर्वथा ॥१८॥

अन्नमय प्राणमय । मनोमय, विज्ञानमय ।
पाचवा तो आनंदमय । पंचकोश जाणपा ॥१९॥

रतिरेताचिये पासूनि । अन्नमयाची उभारणी ।
होण्याजाण्यावरी स्वमनी । अन्नमय असेना ॥२०॥

म्हणोनिया अन्नमय । तू तो नव्हेसी सव्यय ।
त्याते नित्य निरामय । म्हणो नये कदापि ॥२१॥

आपादमस्तकी जो पवन । प्राणमय नाम जाण ।
जडत्व याचे प्रमाण । नव्हे जड तू तैसा ॥२२॥

विकारा भावे म्हणे मी करी । सकळ माझे ऐसे धरी ।
तयास मनोमय निर्धारी । कोश म्हणती ज्ञाते ॥२३॥

तया कोशाचेनि आधारे। कामक्रोधादि बळकट बारे ।
ते क्रोधादि विकारवारे । तू तो नव्हेसि जाणपा ॥२४॥

बुद्धी जड चिदाभासी । एकात राही दुसऱ्या उदासी ।
विज्ञानमय कोश तयासी । म्हणती ज्ञाते ॥२५॥

बुद्धी तव प्रगटे आणि आटे । लीन होय अधिक उठे ।
म्हणोनि सत्यत्वी गोमटे । चारी कोश नव्हेती ॥२६॥

पाचवा तो आनंदमय । निद्रारूप निरामय ।
पुण्यकर्मे सुखी होय । सरलिया उदासी ॥२७॥

तयाचीही गणना करिसी । म्हणोनि तू तो नव्हेसी ।
तया उबग प्रलयासी । लाग पडे सर्वथा ॥२८॥

सर्व कोशाते तू जाणसी । म्हणोनि कोश तू नव्हेसी ।
तू तो नव्हेचि गा विनाशी । अविनाशी सर्वदा ॥२९॥

तव शिष्ये प्रश्न केला । स्वामी ! ही इंद्रिये कळवा मला ।
कर्मेंद्रिय-ज्ञानेंद्रिय संग भला । रूपा माझे स्वामिया ! ॥३०॥

तव बोले करुणाकरू । पुढिलिये निरूपणी अवसरू ।
कर्मेद्रिंय-ज्ञानेंद्रिय-निर्धारू । तू की तयासी जाणता ? ॥३१॥

इतिश्री वेदान्तसारसंमत । दास तुकड्या विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । सहावा अध्याय कथियेला ॥३२॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ! ॥