वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

नसशिल ना झोपला तू

(चाल : शिणले हे नेत्र माझे...)

नसशिल ना झोपला तू, जाउनिया भूतळी ?
म्हणउनिया ऐकिना ही, दीनांची आरळी धृ.

कीर्ती ही गाती गाणीं, शास्त्राला वेढुनी ।
धावत ये चक्रपाणी ! गरुडासी सोडुनी ॥१॥

'कैवारी रंजल्यांचा' महती ही कीर्तनी ।
का उरली वेळ काही, बघण्याची अजहुनी ? ॥२॥

'भारत हा प्रीय माझा' म्हणसी त्या सुरगणी ।
'संकटि मी धाव घाली' गर्जविसी त्या म्हणी ॥३॥

द्रौपदिला वस्त्र देसी, लज्जा ही राखण्या ।
अन्नान्नी भारत-भू ही, चिंधी ना नेसण्या ॥४॥

परकीया हाक मारू, स्वार्थाचे भासती ।
निर्दयता पूर्ण ज्यांना, थोडी ना सन्मती ॥५॥

जातो का प्राण वाया ? पडलीसे ही भिती ।
करु कैसे देवराया ! नावरते ही स्थिती 

ये, ये, ये, अजुनिया ये बघण्यासी निर्बला ।
कंठी हा प्राण वाहे, मंदमती अवकळा 

तुजविण या भारताची, धैर्यमती दुर्बळा ।
तुकड्यासी ठाव देई, सुखवी भू-मंडळा