(चाल : शिणले हे नेत्र माझे...)
ये, सखया ! रामराया ! दे भेटी झडकरी ।
ओरड ही ऐक माझी, ऐकविली अजवरी ॥धृ.॥
वनवासी देह झाला, मन, बुध्दी बावरी ।
आवरि ना काहि केल्या, किति सांगू तुज हरी ? ॥१॥
दुष्पापे पामरासी, किति घडली ही जरी ?
कनवाळू तू दीनाला, क्षमवीसी निर्भरी ॥२॥
भिति वाटे यापुढे ही पळविल का कुणि तरी ?
षड्रिपु हे आड येती, मज दिसताती अरी ॥३॥
डोंगर हे विषय वाटे, पडतिल का ये उरी ?
तुकड्यासी भीक देई, हे मागो आखरी ॥४॥