अगं मिरा ! ऐक माझं म्हणणं,
उभि मिरा रंगमहालात मन हे रंगलं हरि - भजनात ।
सांगे पिता ही मात उभि का,
स्वस्थ अशि ग ! महालात ॥ काय... ॥१॥
सोड साधुचा संग कर मिरा ! राणींचा सहवास ।
नको पिता ! मज राज्य,
मज सुख देइल तो नंदलाल ॥ काय... ॥२॥
तोड तुळसिची माळ घे मिरा ! घाली नवसर हार ।
नको मला तो हार पिता !
मी ना सोडी हरिमाळ ॥ काय... ॥३॥
शुभ्र खादी ही सोड घे मिरा ! सुंदर भरजरि शाल ।
नको मला ती शाल,
होतिल शेवटि तनुचे हाल ॥ काय... ॥४॥
सोड कृष्ण - मंदीर अग मिरा ! जाय घरी खुशियाल ।
नको मला घरदार, हरि !
माझा इथेच निभविल काळ ॥ काय... ॥५॥
सोड साधुचा बोध घे मिरा ! वैभव भवसंसार ।
नको मला संसार पिता !
माझे श्रीहरि पुरविल लाड ॥ काय... ॥६॥
सांगे तुकड्यादास हरिचे भक्त असेचि उदास ।
आस पुरवि रघुनाथ,
पळतो त्यांना पाहता काळ ॥ काय... ॥७॥