वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अमरपुरीची वाट उघडली

(चाल : असार जीवित केवळ माया...)

अमरपुरीची वाट उघडली, या रे या सगळे जाऊ ।
समुदायाने करूनि प्रार्थना, विश्वचालकासी गाऊ ॥धृ.॥

मानवधर्म श्रेष्ठ सकळाहुनि, त्याची शिकवण मिळे तिथे ।
नीचउच्चता सोडुनि सगळे, बसले दिसती एक मते ॥१॥

सर्व जनांना वाव मिळे, अपुलाले भाषण बोलाया ।
सध्दर्माची शिकवण सगळी, मिळे गड्या ! यारे या ॥२॥

माणुसकीचा धडा मिळे, अणि दुर्गुण हे पळती सगळे ।
लाज वाटते पापवृत्तिला, धर्मभाव अंगी उसळे ॥३॥

विश्‍वचालकाच्या कार्याचे, वर्म कळे जाता बसता ।
रंग लागतो अंतरंगिचा, भजन तिथे गाता ठसता ॥४॥

खोवु नका रे संधी असली, करा प्रार्थना चला चला ।
तुकड्यादास म्हणे या लोकी, हाच मार्ग सकळास भला ॥५॥